स्थैर्य, नवी दिल्ली, दि. 29 : कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झाला नसल्याने लॉकडाउन 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कंटेन्मेंट झोनमध्ये 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाउनची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अनलॉक 3 मधील नवे नियम जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये रात्री फिरण्यावरील निर्बंध हटवण्यात आले आहेत. सोबतच योगा इन्स्टिट्यूट आणि व्यायामशाळा सुरू करण्यासाठी 5 ऑगस्टपासून परवानगी देण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 1 ऑगस्टपासून अनलॉक 3 च्या टप्प्याला सुरुवात होत असून यावेळी कंटेन्मेंट झोनबाहेर असणारे निर्बंध अजून शिथिल करत अनके गोष्टी सुरू करण्यास परवानगी देण्यात येत आहे. केंद्रशासित प्रदेश, राज्य सरकार तसेच इतर महत्त्वाच्या विभागांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे.
राज्यात मिशन बिगिन अगेनचा पुढचा टप्पा जाहीर करताना त्याबाबत मार्गदर्शक नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यानुसार सर्वात मोठा निर्णय म्हणजे मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सचे दरवाजे पुन्हा एकदा उघडणार आहेत. तब्बल चार महिन्यांच्या कालावधीनंतर येत्या ५ ऑगस्टपासून राज्यात मॉल्स उघडणार आहेत. त्यासाठी काही नियम निश्चित करण्यात आले आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मॉल खुले राहतील. मॉलमधील थीएटर्स, फूड कोर्ट्स आणि रेस्टॉरंट उघडण्यास मात्र परवानगी देण्यात आलेली नाही. त्यातही काही प्रमाणात दिलासा देताना रेस्टॉरंट आणि फूड कोर्टचे किचन सुरू ठेवण्याची व होम डीलिव्हरीची मुभा मात्र देण्यात आली आहे.
मिशन बिगिन अगेन अंतर्गत आधी देण्यात आलेल्या सर्व सवलती यापुढेही कायम राहणार आहेत. याशिवाय संघांशिवाय खेळल्या जाणाऱ्या खेळांबाबत निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यात गोल्फ, नेमबाजी, जीमनॅस्टिक, टेनिस, बॅडमिंटन, मल्लखांब या खेळांस ५ ऑगस्टपासून परवानगी देण्यात आली आहे. फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटेशन याचे काटेकोरपणे पालन करण्याची अट त्यासाठी घालण्यात आली आहे.
टॅक्सी व कॅबमध्ये चालक आणि ३ प्रवासी, रिक्षात चालक आणि दोन प्रवासी, चार चाकी वाहनात चालक अधिक ३ जणांना प्रवासाची मुभा आता असणार आहे. दुचाकीवर दोन जण आता जाऊ शकणार आहेत. या दोघांनीही हेल्मेट व मास्क घालणे बंधनकारक असणार आहे. सर्व प्रकारच्या प्रवासात मास्क सक्ती असेल, असेही पुढे नमूद करण्यात आले आहे.