स्थैर्य, सातारा, दि.१ : ओझर्डे (ता. वाई) येथील जुगार अड्ड्यावर सातारा स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून सुमारे 86, 970 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सोमवारी (दि. 30) स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक वाई परिसरात गस्त घालत असताना सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ओझर्डे गावातील सोनेश्वर कृष्णा नदीचे पुलाखालील मोकळ्या जागेत काही इसम तीन पानी जुगार पैजेवर पैसे लावून खेळत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी त्वरित सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उत्तम दबडे यांना आदेश दिल्याने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील साध्या वेशातील पोलीस स्टाफसह घटनास्थळी पंचासह जाऊन छापा टाकला असता, सदर ठिकाणी एकूण सहा इसम जुगार खेळताना मिळून आले. त्यापैकी एक इसम पोलिसांची चाहूल लागताच पळून गेला. त्याठिकाणी सुमारे 86 हजार 970 रु. किमतीचा मुद्देमाल त्यात जुगार साधने, रोख रक्कम, मोबाईल व दोन दुचाकी मिळून आल्या आहेत.
या कारवाईत जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उत्तम दबडे, पो.हवा. संतोष सपकाळ, संतोष पवार, रवींद्र वाघमारे, प्रवीण कांबळे, विजय सावंत यांनी सहभाग घेतला.