स्थैर्य, चंद्रपूर, दि. २२: जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी दक्ष राहून युद्ध पातळीवर काम करत रुग्णांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष द्यावे. आता तालुकास्तरावरच ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणीसाठी प्रयत्न सुरू असून ऑक्सिजन पॉईंट तातडीने वाढविण्यात येणार आहे त्यामुळे ग्रामिण भागातील रुग्णाची तालुकास्तरावरच सोय उपलब्ध होणार असल्याने अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालावे असे निर्देश मदत व पुनर्वसनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत दिले.
पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 बाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता याबाबत तातडीने करावयाची उपाययोजना यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडून आढावा घेत आहेत.
जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारावयाचे असून त्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून ठेवावी, तसेच ऑक्सीजन बेड तयार करावयाचे असून त्यासाठी आवश्यक ती पर्यायी जागा, पाण्याची व्यवस्था, विजेची व्यवस्था करून घ्यावी जेणेकरून विहित कालावधीत काम पूर्ण करता येईल असे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले.
प्रत्येक पीएससी येथे कोविड केअर सेंटर सुरू करावे व त्यामध्ये किमान दहा ऑक्सिजन बेड तयार करण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात अशा सूचना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. या कोरोना संकटाच्या काळात कोणत्याही रुग्णांची गैरसोय होता कामा नये तसे आढळल्यास तातडीने मला संपर्क साधावा, असे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी त्यांच्या तालुक्यातील काही महत्त्वाचे मुद्दे मांडले त्याचे निराकरण पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केले. तसेच तालुक्यात ऑक्सिजन व वाहनांची उपलब्धतेची मागणी केली. त्याबाबत निधीची मागणी असल्यास जिल्हाधिकार्यांकडे त्वरित मागणी करावी व ते काम पूर्णत्वास न्यावे असेही ते यावेळी म्हणाले.
जिल्ह्यात जनता कर्फ्यूमध्ये ग्रामीण भागातील अत्यावशक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने सुद्धा सर्रासपणे उघडी असतात त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो यावर आळा घालण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक यांनी सदर दुकानांवर नियंत्रण ठेवावे व नियमांचे पालन न केल्यास योग्य ती कारवाई करावी, प्रशासनाला सहकार्य करीत लॉकडाऊन संदर्भात आवश्यक ती भूमिका पार पाडावी अशा सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्यात.