दैनिक स्थैर्य | दि. ३१ ऑक्टोबर २०२१ | सातारा | जरंडेश्वर साखर कारखान्याला खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह संचालक मंडळाच्या मान्यतेने च कर्जपुरवठा करण्यात आला आहे. आरबीआय आणि नाबार्ड यांनी घालून दिलेल्या नियमानुसारच सर्व प्रक्रिया पार पडली असून जरंडेश्वरचे हप्ते देखील वेळेत बँकेला प्राप्त झालेले आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, उदयनराजेंचे सल्लागार त्यांना चुकीचा सल्ला देत आहेत. बँकेचे कामकाज अत्यंत उत्तमरित्या सुरू असून संपूर्ण भारतात ही बँक नावाजलेली आहे. त्यामुळे काहीही बोलून बँकेची बदनामी करणे थांबवावे. जरंडेश्वर कारखान्याला दिलेले कर्ज हे नियमित परतफेड केले जात आहे. बँकेचे ऑडिट नाबार्डच्या माध्यमातून वेळोवेळी होत असते बँकेत जर चुकीचे काही घडले असते तर बँकेचे कौतुक देशभर झाले नसते.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेतकरी ग्रुप क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स पॉलिसी बाबत काही संचालक चुकीची व तथ्यहीन माहिती सांगून शेतकरी सभासदांची दिशाभूल करीत आहेत. त्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. याउलट बँक कायम शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून विविध योजना राबवत असून त्याचा लाभ अनेक सभासद व खातेदारांना होत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोट्या व अपुऱ्या माहितीच्या आधारे काही संचालक जाणीवपूर्वक अपप्रचार करीत आहेत त्यावर सभासद विश्वास ठेवणार नाहीत, असेही शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले.
या पॉलिसीचे धोरण खूप मोठे असल्याने जवळजवळ २.५० लाख शेतकऱ्यांसह एक अवलंबित व्यक्ती (५ लाख व्यक्ती) यांचेसाठी असलेने विमा कंपन्यांशी चर्चा करणे गरजेचे होते. त्याकामी बँकेने राष्ट्रीयकृत विमा कंपनी कडून स्पर्धात्मक कोट घेतले. राष्ट्रीयकृत विमा कंपनीना अटी आणि शर्तींसह दरपत्रक, आजारांची यादी, शेतकऱ्यांची यादी देण्यात आली.
बँक दरपत्रक मिळवण्यासाठी विमा कंपन्यांकडे वारंवार पाठपुरावा करत आहे . परंतु सध्याची कोरोना परिस्थिती आणि सुमारे ५ लाख व्यक्ती असणारी एवढी मोठी पॉलिसी असल्यामुळे विमा कंपन्या त्यावर अभ्यास करून कोटेशन देतो असे वेळोवेळी सांगत होत्या. या पॉलिसीसाठी बँकेच्या संचालक मंडळाने पूर्वीचा अनुभव पहाता साधारणपणे १० ते १२ कोटी खर्च ग्राह्य धरला होता, तथापी सध्याच्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या नुकसानीमुळे भारतातील सर्व विमा कंपन्यांनी आरोग्य विम्याचे दर खूप मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत. त्यामुळे प्रिमियम दर वाढला आहे.
उदयनराजेंच्या ८२ बैठका पैकी ६२ बैठकांना रजा
संचालक मंडळाची वेळ बैठक घेण्यात येत असे संचालकांना बँकेतर्फे कळविण्यात येत असते. उदयनराजे हे संचालक आहेत बँकेच्या ८२ संचालक मंडळाच्या बैठका झाल्या त्यापैकी तब्बल ६२ बैठकांना ते गैरहजर होते. प्रत्येक वेळी ते रजेचे कारण देत होते, त्या रजेच्या अर्जावर माझी सही असायची, असे देखील शिवेंद्रराजे यांनी नमूद केले.