पेटीएम ऍपवर ‘लाइव्ह ट्रेन स्टेटस’ सुविधा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑगस्ट २०२२ । मुंबई । डिजिटल पेमेंट्स आणि विविध वित्तीय सेवांसाठी पेटीएम देशभरात लोकप्रिय आहे. लाखो लोक या सेवेचा वापर करतात. आपल्या लाखो ग्राहकांसाठी पेटीएम सतत नवनवीन सुविधा उपलब्ध करत असते. वन ९७ कम्युनिकेशन्सच्या मालकीच्या या देशातील आघाडीच्या डिजिटल पेमेंट्स आणि वित्तीय सेवा कंपनीने आता ग्राहकांसाठी लाइव्ह ट्रेन स्टेटस ही अभिनव सुविधा दाखल केली आहे. या सुविधेद्वारे वापरकर्त्यांना रेल्वेचे थेट स्थान आणि रेल्वे ज्या प्लॅटफॉर्मवर येत आहे त्याची अद्ययावत माहिती एका क्लिकवर जाणून घेता येते. पेटीएम आता रेल्वे प्रवासासाठी तिकीट नोंदणीसह अनेक सेवा उपलब्ध करते.

पेटीएम ऍपद्वारे, वापरकर्ते रेल्वेचे तिकीट बुक करू शकतात, पीएनआर आणि ट्रेनची स्थिती तपासू शकतात, जेवण ऑर्डर करू शकतात. तसेच २४ तास अखंड ग्राहकसेवा मिळवू शकतात. युपीआयद्वारे शून्य पेमेंट गेटवे शुल्कावर तिकिटे बुक करण्याची आणि पेटीएम पोस्टपेडद्वारे आधी खरेदी नंतर पैसे देण्याची सुविधा मिळवू शकतात.

हे ऍप मराठी, हिंदीसह बांगला, तेलुगु, तमिळ, गुजराती, कन्नड, मल्याळम, पंजाबी, उडिया आदी १० हून अधिक भाषांमध्ये तिकीट बुकिंग सेवा प्रदान करते. कोणत्याही छुप्या खर्चाशिवाय  किंवा अतिरिक्त शुल्काशिवाय कंपनी आकर्षक सवलतीही देते. ज्येष्ठ नागरिक कोट्याचाही लाभ घेता येऊ शकतो. ६० वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे पुरुष प्रवासी आणि ४५ वर्षे वयाच्या महिला प्रवासी लोअर बर्थ तिकीट बुक करू शकतात.

या नव्या सुविधेबाबत बोलताना पेटीएमचे प्रवक्ते म्हणाले, “आम्ही वन-स्टॉप सीमलेस बुकिंगचा अनुभव देतो. लाखो रेल्वे प्रवाशांना लाइव्ह ट्रेन स्टेटससारख्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांची आवश्यकता आहे. याची आम्हाला जाणीव आहे. आम्ही पेटीएम युपीआय, पेटीएम वॉलेट,पेटीएम पोस्टपेड (बाय नाऊ, पे लेटर), नेटबँकिंग, डेबिट आणि क्रेडिट कार्ड यांसारख्या पेमेंट पद्धतींचा वापर करण्याची लवचिकता देतो.”


Back to top button
Don`t copy text!