सौ. वेदांतिकाराजे; परमाळेत ६५० फळझाडांची लागवड
स्थैर्य, सातारा, दि. 01 : दरवर्षी अनेक संस्थांच्या आणि शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाते. मात्र देखभाली अभावी ही झाडे पुढे जगत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. झाडे जगली पाहिजेत आणि पर्यावरण संवर्धन झाले पाहिजे यासाठी कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी आम्ही हवी ती झाडे तुमच्या जागेत लावून देवू. तुम्ही ती जगवा, त्या झाडांचे मालक व्हा आणि फळे चाखा, या अभिनव उपक्रमांतर्गत परमाळे ता. सातारा येथे माणसी एक अशी ६५० फळझाडांची लागवड करण्यात आली. यावेळी झाडे जगवा आणि त्या झाडाची फळे चाखा आणि त्याद्वारे निसर्ग संवर्धन करा, असा मोलाचा संदेश सौ. वेदांतिकाराजे यांनी दिला.
कर्तव्य सोशल ग्रुपच्या या पायलट प्रोजेक्टचा गतवर्षी शेळकेवाडी ता. सातारा येथून प्रारंभ झाला होता. परमाळे हे या उपक्रमातील पाचवे गाव ठरले असून कर्तव्य सोशल ग्रुपने गावातील लोकसंख्येनुसार प्रत्येकाला हवे ते झाड मोफत दिले. यामध्ये कलमी आंबा, चिकू, पेरू, नारळ आदी फळझाडांचा समावेश आहे. सौ. वेदांतिकाराजे भोसले, शेतकरी स्वयंसहायता गटाचे अध्यक्ष बाजीराव कदम, अशोक कदम, सरपंच सुमन कदम, उपसरपंच जयसिंग कदम, माजी सरपंच हणमंत कदम, संपतराव कदम, आनंद कदम, रामदास कदम, संतोष कदम, शुभांगी कदम, वैजयंता कदम, कु. वैष्णवी कदम, वाघजाई माता सांस्कृतिक मंडळ, गणेशोत्सव कि‘डा मंडळाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत विविध ठिकाणी झाडे लावण्यात आली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्यात आले तसेच सर्वांनी मास्क परिधान केला होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वेदांतिकाराजे यांनी वृक्षारोपण आणि संवर्धनाचे महत्व ग्रामस्थांना पटवून दिले. त्या म्हणाल्या की, दरवर्षी पावसाळा सुरु झाला की, शासन आणि विविध संस्थांच्या माध्यमातून वृक्षारोपण केले जाते. मात्र संवर्धन आणि देखभाल न झाल्याने ही झाडे जगत नाहीत हे वास्तव आहे. त्यामुळेच कर्तव्य सोशल ग्रुपने व ग्रामस्थ लावलेल्या झाडाचे वृक्षात रुपांतर करण्यासाठी, त्यांचे संवर्धन करण्यासाठी इच्छुक आसतील त्यांना मोफत हवी ती झाडे देवून ती लावण्याचा निर्णय घेतला. फक्त लावलेली झाडे त्या ग्रामस्थाने जगवली पाहिजेत, अशी अट आहे. आम्ही लावून दिलेल्या झाडाचे मालक व्हा आणि तुम्हीच त्या झाडाची फळे खा, फक्त झाडे जगवा आणि निसर्गाचे रक्षण करा या एकमेव उद्देशाने हा उपक्रम राबवला आहे. यासाठी परमाळे ग्रामस्थांचे अनमोल सहकार्य लाभले असून इतर गावातील ग्रामस्थ इच्छुक असतील तर, त्याही गावात हा उपक्रम राबवणार असल्याचे सौ. वेदांतिकाराजे यावेळी म्हणाल्या.
पुढच्या वर्षी बोलवापरमाळे येथे ग्रामस्थांच्या मागणीनुसार त्यांना हवी ती फळझाडे लावून देण्यात आली आहेत. ग्रामस्थांनीही उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी आषाडीला मला पुन्हा बोलवा आणि जगवलेली झाडे दाखवा, झाडांचा वाढदिवस साजरा करा असे सौ. वेदांतिकाराजे याप्रसंगी म्हणाल्या. दरम्यान, अशोक कदम यांनी प्रत्येक झाड जगवलं जाईल आणि वाढदिवस उत्साहात साजरा केला जाईल, असे वचन ग्रामस्थांच्यावतीने यावेळी दिले.