
स्थैर्य, वाठार निंबाळकर, दि. १९ ऑगस्ट : उपासक आणि उपासिकांनी वर्षावास काळामध्ये दहा पारमितांचे पालन करून आणि धम्माचे आचरण करून सदाचारी जीवन जगावे, असे प्रतिपादन भदंत कश्यप यांनी केले. भारतीय बौद्ध महासभा, फलटण तालुका शाखेच्या वतीने वर्षावासानिमित्त वाठार निंबाळकर येथे आयोजित धम्म प्रवचन मालिकेमध्ये ते बोलत होते.
यावेळी धम्मदेसना देताना भदंत कश्यप म्हणाले की, तथागत भगवान बुद्धांनी स्वतःला कधीही धम्माचे संस्थापक म्हटले नाही, ते केवळ मार्गदर्शक ‘शास्ता’ होते. त्यांनी पंचस्कंधाची (रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान) संकल्पना समजावून सांगितली. तसेच दान, शील, प्रज्ञा, वीर्य, सत्य, मैत्री यांसारख्या दहा पारमितांचे पालन करून कोणीही व्यक्ती निर्वाण प्राप्त करू शकते. ही मूल्ये केवळ बौद्धांसाठी नसून संपूर्ण मानवजातीसाठी आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला विज्ञानवादी धम्म दिला आहे. त्रिसरण पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग, दहा पारमिता आणि डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या २२ धम्म प्रतिज्ञा हीच बौद्धांची खरी आचारसंहिता आहे. ही आचारसंहिता पाळल्याशिवाय ‘भारत बुद्धमय’ करण्याचा बाबासाहेबांचा संकल्प पूर्ण होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी भदंत कश्यप यांनी कामवासना, द्वेष, आळस, चंचलता आणि संशय या पाच विकारांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले. या धम्म प्रवचन कार्यक्रमास केंद्रीय असिस्टंट स्टाफ ऑफिसर दादासाहेब भोसले, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष महावीर भालेराव, महासचिव बाबासाहेब जगताप, कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि वाठार निंबाळकर येथील बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.