
दैनिक स्थैर्य । 22 मे 2025। सातारा । सज्जनगड येथे श्रीरामदास स्वामी संस्थानच्या वतीने महाराष्ट्रातील पंत वायय अभ्यासक समूहाचे पहिले संमेलन 27 ते 29 मेअखेर होणार आहे. या तीन दिवसीय संमेलनात कविवर्य मोरोपंत यांच्या वाड़मयाचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला जाईल.
महाराष्ट्रात मोरोपंतांनी रचलेल्या आर्या, केकावली, रामायण, स्फूट प्रकरणे अशा वाड़मयाचा अभ्यास करणारे, त्यावर संशोधन
करणारे अनेक अभ्यासक आहेत. पंत साहित्यावर बहुतेक सर्व पातळ्यांवर चर्चा, विचारमंथन, लेखन असे कार्यक्रम कमी-अधिक प्रमाणात होतात. या साहित्याचा अभ्यास पुन्हा सुरू व्हावा, हा या संमेलनाच्या आयोजनाचा हेतू आहे. मराठी भाषेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे मोरोपंती साहित्य हे प्रत्येक मराठी माणसाने अभ्यासावे, असे असल्याची माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली.
27 मे रोजी सकाळी नऊ वाजतासंमेलनाचे उद्घाटन होणार आहे. त्यावेळी संस्थानचे अध्यक्ष भूषण स्वामी, विश्वस्त सु. ग. तथा बाळासाहेब स्वामी, श्रेष्ठ कीर्तनकार उपस्थित राहणार आहेत. संमेलनात तीन दिवसांमध्ये चिन्मय गोखले, दाजीबुवा मालवणकर, मधुरा पावसकर, रामचंद्रबुवा भिडे, संतोष माळवदकर, पराग चातचुर्मासे, राधिका आडीवरेकर, ओंकार मुळ्ये, प्रणव जोशी, श्रीपाद कुलकर्णी, चिन्मय पुजारी, यशोधन एकतारे, प्रणय पटवारी, प्रभंजन भगत यांची व्याख्याने होणारआहेत.
त्याचप्रमाणे विवेकबुवा गोखले, श्रेयसबुवा कुलकर्णी, रामचंद्रबुवा भिडे यांची तीन दिवस रोज रात्री नऊ ते अकरा या वेळेत कीर्तने होणार आहेत. सर्व व्याख्याते निष्णात असून, ते पंत साहित्यातील विविध विषयांवर विचार मांडतील. अभ्यासकांनी या संमेलनाचा लाभघ्यावा, असे आवाहन भूषण स्वामी, बाळासाहेब स्वामी यांनी केले आहे.