स्थैर्य, नवी दिल्ली, दि. 30 : टिक टॉक आणि यूसी ब्राउझरसह 59 चिनी अॅपवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. माहिती प्रसारण खात्यानं आयटी ॲक्टच्या सेक्शन 69A अंतर्गत हा निर्णय घेतला आहे.
टिकटॉक, पबजी, यूसी ब्राउजर आणि शेअरइट सारख्या ऍप्सचा यामध्ये समावेश आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं हा निर्णय घेत बंदी घालण्यात आलेल्या अॅपची यादी जारी केली आहे.
भारताच्या सार्वभौमत्वाला आणि लोकांच्या खासगी आयुष्यातल्या सुरक्षेला या अॅपमुळे धोका असल्याचं भारत माहिती प्रसारण खात्याचं म्हणणं आहे.
भारतातल्या कोट्यवधी इंटरनेट वापरकर्त्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने हे पाऊल उचलत असल्याचं माहिती प्रसारण खात्यानं म्हटलंय. यामुळे भारताच्या सायबरस्पेसची सुरक्षा राखणं सोपं होणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
या बंदीबद्दल टिकटॉकचं काय म्हणणं आहे?
सरकारने टिकटॉकसहित 59 अॅप बंद करण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही या प्रक्रियेवर काम सुरू केलं आहे. सरकारची सूचना आल्यानंतर आम्ही सरकारने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना भेटून स्पष्टीकरण देणार आहोत. भारत सरकारने घालून दिलेल्या नियमांप्रमाणेच टिकटॉकचं कामकाज चालतं.
डेटा प्रायव्हसीबद्दल सरकारचे जे नियम आहेत त्यानुसारच टिकटॉक काम करत आहे. त्यामुळे आम्ही आतापर्यंत कोणत्याही युजरची माहिती कोणत्याही सरकारला पुरवलेली नाही अगदी चीनच्या सरकारला देखील. आमच्या युजरची माहिती आणि प्रायव्हसी जपणे हे आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे.
भारतातील 14 स्थानिक भाषांमध्ये टिकटॉक उपलब्ध करून देऊन आम्ही इंटरनेटचं लोकशाहीकरण केलं आहे. टिकटॉकचा वापर लाखो लोकांकडून केला जात आहे. यामध्ये कलाकार आहेत, स्टोरी टेलर्स आहेत, शैक्षणिक मार्गदर्शन करणारे लोक आहेत. अनेकांची उपजीविका टिकटॉकमधून येते असं टिकटॉक इंडियाचे प्रमुख निखील गांधी यांनी म्हटलं आहे.
बंदी घालण्यात आलेल्या अॅपची यादीटिकटॉक, शेअरइट, क्वाई, यूसी ब्राऊजर, बैदू मॅप, शीन, क्लॅश ऑफ किंग्स, डीयू बॅटरी सेव्हर, हॅलो, लाइकी, यूकॅम मेकअप, मी कम्युनिटी, सीएम ब्राऊजर, व्हायरस क्लीनर, एपीयूएस ब्राऊजर, रोमवी, क्लब फॅक्टरी, न्यूजडॉग, ब्युटी प्लस, वीचॅट, यूसी न्यूज, क्यूक्यू मेल, वीबो, झेंडर, क्यूक्यू म्युझिक, क्यूक्यू न्यूजफीड, बिगो लाईव्ह, सेल्फी सिटी, मेल मास्टर, पॅरलल स्पेस, वीसिंक, इएस फाईल एक्सप्लोरर, व्हीवो व्हीडिओ – क्यू यू व्हीडिओ इंक, मेंतू, व्हीगो व्हीडिओ, मी व्हीडिओ कॉल – शाओमी, न्यू व्हीडिओ स्टेटस, डीयू रेकॉर्डर, व्हॉल्ट – हाईड, कॅशे क्लीनर डीयू अॅप स्टुडिओ, डीयू क्लीनर, डीयू ब्राऊजर, हागो प्ले वीथ न्यू फ्रेंड्स, कॅम स्कॅनर, क्लीन मास्टर – चीताह मोबाईल, वंडर कॅमेरा, फोटो वंडर, क्यूक्यू प्लेअर, वी मीट, स्वीट सेल्फी, बायडू ट्रान्सलेट, व्हीमेट, क्यूक्यू इंटरनॅशनल, सिक्युरिटी सेंटर, क्यूक्यू लॉन्चर, यू व्हीडिओ, व्ही फ्लाय, स्टेटस व्हीडिओ, मोबाईल लिजंड्स, डीयू प्रायव्हसी.
सरकारनं बंदी घातल्यामुळे आता ऍन्ड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्ले स्टोरमधून हे अॅप्स भारतात हाटवले जातील. दरम्यान भारत सरकारनं लोकांना या ऍप्सला अनइनस्टॉल करण्याचं आवाहन मात्र केलेलं नाही. त्यामुळे लोकांना त्यांची इच्छा असेपर्यंत हे त्यांच्या फोनमध्ये कायम राहू शकतील. त्यांना मॅन्युअली हटवल्यानंतरच ते जाऊ शकतील. पण लोकांना आता हे अॅप अपडेट करता येणार नाहीत.