दैनिक स्थैर्य । दि. 05 ऑक्टोबर 2021 । फलटण । मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर या प्रशालेमध्ये लायन्स क्लब, फलटण प्लॅटिनमच्यावतीने आयोजित केलेले टीचर ट्रेनिंग वर्कशॉप शिक्षकांना मार्गदर्शक असून लायन्स क्लबचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे गौरवोद्गार, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
फलटण येथील फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर येथे लायन्स क्लब फलटण प्लॅटिनियम तर्फे आयोजित केलेल्या टीचर ट्रेनिंग वर्कशॉपच्या समारोपा प्रसंगी श्रीमंत संजीवराजे बोलत होते. यावेळी द्वितीय प्रांतपाल एम.जे. एफ. लायन भोजराज ना.निंबाळकर, महात्मा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले, भाऊसाहेब कापसे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव माने, निलेश बुरुंगले, लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमच्या अध्यक्षा लायन सौ. निलम लोंढे- पाटील लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमच्या सेक्रेटरी तथा फलटण नगर परिषदेच्या नगरसेविका लायन सौ. वैशाली चोरमले, खजिनदार लायन सौ. मंगल घाडगे, लायन्स क्लब मुधोजी चॅरिटेबल आय ट्रस्टचे चेअरमन लायन अर्जुनराव घाडगे, लायन क्वेस्टचे चेअरमन लायन सुहास निकम, गायडींग लायन मंगेशशेठ दोशी, लायन प्रमोद जगताप, लायन प्रताप निंबाळकर, लायन विजयकुमार लोंढे- पाटील इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना नवनवीन शिक्षण मिळणे गरजेचे असते. सध्याचा विद्यार्थी अपडेट असल्यामुळे शिक्षकांनी बदलत्या काळानुसार आपले ज्ञान प्रशिक्षणाच्या माध्यमातून अपडेट करून महत्त्वाचे असून लायन्स क्लबने शिक्षण या क्षेत्राकडे लक्ष दिल्यामुळे भविष्यात याचे निश्चितच चांगले परिणाम दिसून आल्याशिवाय राहणार नाही, असेही शेवटी श्रीमंत संजीवराजे म्हणाले.
दरम्यान, या प्रशिक्षणामध्ये जवळपास 70 शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे काम इंटरनॅशनल ट्रेनर लायन बी. एल. जोशी यांनी आपल्या ओघवत्या शैलीमध्ये केले.