स्थैर्य, फलटण : फलटण लायन्स क्लबने 53 वर्षात सेवा कार्याच्या नवनव्या संकल्पना रुजवीत या क्षेत्रात सर्वोच्च स्थान गाठले असतानाच यावर्षी राज्यातील सर्व 375 लायन्स क्लबमध्ये सर्वोत्कृष्ट क्लब (बेस्ट क्लब ऑफ दि मल्टीपल) हा बहुमान व अन्य 5 पुरस्काराद्वारे सेवा कार्यातील आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. करोना व्हायरस प्रादुर्भाव नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर सर्वच संस्था संघटनांच्या वार्षिक सभासंमेलनावर निर्बंध आले असताना लायन्स मल्टीपलची ऑनलाईन सभा होवून त्यामध्ये फलटण लायन्स क्लबला बेस्ट क्लब ऑफ दि मल्टीपल या पुरस्कारासह एकुण ६ पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
फलटण लायन्स क्लब 323 डी या प्रांतामधील 58 क्लबमध्ये सेवाकार्यात आघाडीवर असतानाच सन 1967/68 मध्ये स्थापन झालेल्या या मुख्य क्लबसह महिलांचा गोल्डन क्लब, तरुण दांम्पत्याचा डायमंड क्लब आणि लायनेस क्लब अशा 4 लायन्स क्लबद्वारे फलटण तालुक्यात 200 सभासद सेवा कार्याची ही पालखी सातत्याने मिरवीत कोणत्याही प्रसंगात समाजाला मदत करण्यात आघाडीवर असल्याचे दिसून येते.
फलटण लायन्स क्लबने गेल्या 53 वर्षातील सेवाकार्याच्या परंपरेद्वारे समाजामध्ये एक वेगळी प्रतिमा निर्माण केली असून लायन्स डिस्ट्रीक्ट 323 डी 1 मध्ये या क्लबने सेवा कार्याची उज्वल परंपरा निर्माण केली आहे. क्लबच्या माध्यमातून सन 1995 मध्ये लायन्स क्लब चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करुन त्या माध्यमातून पद्मभूषण डॉ. एम.सी.मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली अंधत्व निवारणाच्या कामाला सुरुवात केली त्यातून सन 1999 मध्ये लायन्स मुधोजी नेत्र रुग्णालयाची स्थापना स्व. डॉ. एम.सी. मोदी यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर अंधत्व निवारणाच्या कामाला गती प्राप्त झाली या रुग्णालयासाठी स्वत:ची प्रशस्त वास्तू उभारण्याचे काम सुरु असून लवकरच हे रुग्णालय स्वत:च्या वास्तूत कार्यरत होईल याची ग्वाही लायन्स क्लब फलटणचे अध्यक्ष अर्जुन घाडगे यांनी दिली आहे.
फलटण लायन्स क्लबच्या माध्यमातून शहरातील माळजाई उद्यानाचा सर्वांगीण विकास सुरु असून त्यामध्ये सभामंडप, महादेव मंदिर, स्व. लायन हरिभाऊ निंबाळकर उद्यान, ला. सांस्कृतिक केंद्र, लायनेस चिल्ड्रन पार्क, ज्येष्ठ नागरिक विसावा केंद्र वगैरे विविध उपक्रमासह लायन्स सभागृह व व्यासपीठ उभारण्यात आले आहे. या परिसरातच विद्यार्थी बुध्दी विकास प्रकल्प म्हणून सन 2005 पासून अबॅकस सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे.
ताथवडा ता. फलटण येथील आश्रमशाळा दत्तक घेवून सुमारे 25 वर्षापासून तेथील भटक्या विमुक्त निराधार विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी वह्या पुस्तके, शालेय गणवेश आणि राष्ट्रीय सणांना मिष्ठान्न भोजन हा उपक्रम राबविण्यात येतो. तेथे विद्यार्थ्यांसाठी भोजनगृह व पाणपोई उभारण्यात आली आहे. तालुक्यातील विविध गावांमध्ये एसटी प्रवाशांसाठी पीकअप शेड्स, फलटण बसस्थानकासह अन्य काही ठिकाणी पाणपोई सुरु करण्यात आली आहे.
लायन्स अंतरराष्ट्रीय संघटनेच्या कार्यक्रमानुसार शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम (लायन्स क्वेस्ट) हा उपक्रम अत्यंत प्रभावी पध्दतीने राबवुन 165 शिक्षकांना प्रशिक्षण दिले असून त्याचा लाभ तालुक्यातील सुमारे 7 हजार विद्यार्थ्यांना होणार आहे त्यासाठी या विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. संपूर्ण जगामध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेल्या या शिक्षण प्रणालीमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होवून सुसंस्कारित पिढी घडविण्यास मदत होत आहे.
करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गरजूंना अन्नधान्य व इतर आवश्यक वस्तू तसेच विलगीकरण कक्षातील रुग्णांसाठी बेडस, उशा, बेडशीट मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे नगर परिषद अन्नछत्रासाठी अन्नधान्य व किराना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. गतवर्षी सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे नुकसान झालेल्या आपद्ग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य व कपड्यांची मदत प्रत्यक्ष घटनास्थळाव जावून करण्यात आली.
सलग 53 वर्षे सेवाकार्यात आघाडीवर असलेल्या या क्लबने यावर्षी लायन अध्यक्ष अर्जुनराव घाडगे, सचिव ला. योगेश प्रभुणे व सचिव प्रमोद जगताप यांचे नेतृत्वाखाली अतिशय दैदिप्यमान कामगिरी करीत क्लबच्या लौकिकात मोलाची भर घातल्यानेच महाराष्ट्रातील मुंबई वगळता 375 क्लबचा समावेश असलेल्या मल्टीपलमध्ये फलटण क्लबचा फार मोठा गौरव करण्यात आला त्यावेळी या क्लबला बेस्ट क्लब ऑफ दि मल्टीपल या पुरस्काराने तसेच बेस्ट अॅक्टिव्हिटी ऑफ दी मल्टीपल, बेस्ट करोना डोनेशन ऑफ दि मल्टीपल, बेस्ट क्वेस्ट प्रोग्रॅम आफ द मल्टीपल या 3 पुरस्काराने लायन अर्जुनराव घाडगे, बेस्ट लायन्स क्वेस्ट दि चेअरमन ऑफ मल्टीपल लायन सुहास निकम आणि बेस्ट ट्रेझरर ऑफ दि मल्टीपल लायन प्रमोद जगताप यांना गौरविण्यात आले आहे.
लायन्स क्लब फलटणने या पूर्वी ज्येष्ठ एम.जे.एफ लायन प्राचार्य डॉ. राजेंद्र शहा यांच्या माध्यमातून प्रांताचे नेतृत्व केले आहे. आता ज्येष्ठ लायन एम.जे.एफ ज्येष्ठ लायन भोजराज नाईक निंबाळकर हे प्रांताचे नेतृत्व करण्यासाठी पुढे आले असून त्यांना ही संधी देण्यासाठी सर्वस्तरावरुन प्रयत्न सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे.