डॉक्टर देवदूतांसारखे, त्यांचा अपमान झालेला नाही – संजय राऊत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि. १७ : करोना संकटाच्या काळात देवदुतासारखे धावून आले. त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले. अशा डॉक्टरांविषयी आम्हाला नेहमीच आदर आणि आस्था आहे. त्यामुळे त्यांचा अपमान करण्याचा प्रश्नच येत नाही, असं सांगतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटना ही चीनची हस्तक असल्याचं सांगून त्यांची रसद बंद केली आहे. रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन यांनीही डब्ल्यूएचओवर टीका केली आहे. मग त्यांचाही निषेध नोंदवणार आहात का?, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी डॉक्टरांच्या संघटनांना फटकारले. तसेच अपमान आणि कोटी यातील फरक समजून घ्या, असंही त्यांनी सांगितलं.

डॉक्टरांपेक्षा मी कंपाऊंडरकडून औषधे घेतो. त्याला अधिक कळतं, असं विधान संजय राऊत यांनी केलं होतं. त्याला आक्षेप घेत मार्डने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली असून राऊत यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. त्यावर बोलताना राऊत यांनी त्यांच्या प्रतिक्रियेवर ठाम असल्याचं सांगितलं. तसेच मार्डलाही फटकारले. डॉक्टरांवर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा शिवसेनाच धावून आली. मी स्वत: अनेक प्रकरणात डॉक्टरांची बाजू घेऊन त्यांच्या मागण्या मार्गी लावल्या आहेत. डॉक्टरांना मारहाण झाली तव्हा तोडफोड करणाऱ्यांना आम्हीच समजावून समेट घडवून आणला आहे. मात्र, सध्या विशिष्ट विचारसरणीचे लोक माझ्या विरोधात मोहीम चालवत आहेत, असं सांगतानाच डॉक्टरांचा मी अपमान केलेला नाही. डॉक्टरांबाबत मी कोणतंही चुकीच विधान केलेलं नाही. कशासाठी डॉक्टराचां अपमान करावा. माझ्या बोलण्याच्या ओघात एक शब्द तुटकपणे येतो आणि त्यावर राजकारण केलं जातं हे चुकीचं आहे, असं सांगतानाच अपमान आणि कोटी यातील फरक समजून घ्या, माझ्या बोलण्यामागची भावना समजून घ्या, असं राऊत म्हणाले.

राजकारणी आणि वकिलांवरही कोटी होते. वर्षानुवर्षे शीख समाजावरही कोटी केली जात आहे. पण तरीही ते सीमेवर लढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी असो की मनमोहन सिंग… यांच्यावरही कोटी केली जाते. उलट माझ्याकडून बोलण्याच्या ओघात कोटी झाली असेल तर त्याचं कौतुकचं केलं पाहिजे. आपल्या देशातील डॉक्टर हे कंपाऊंडरलाही तयार करतात. त्यांनाही सक्षम करतात हे तर डॉक्टरांचं कौतुकच आहे, असं सांगतानाच कंपाऊंडर हे काही टाकाऊ नाहीत. त्यांचंही इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच वैद्यकीय क्षेत्रातील योगदान मोठं आहे. कंपाऊंडरबद्दल गौरवोद्गार काढले म्हणजे विशिष्ट राजकीय विचारसरणीच्या डॉक्टरांना राग यायचं कारण नाही, असं ते म्हणाले.

मी डब्ल्यूएचओबद्दल बोललो त्याचा आणि इथल्या डॉक्टरांचा काय संबंध नाही. मुळात मी डब्ल्यूएचओला आरोग्य संघटनाच मानायला तयार नाही. ती राजकारण्यांची बटीक झालेली नाही. हे माझं मत नसून स्वत: ट्रम्प यांचं मत आहे. त्यावर बोलायचं तर केंद्रीय आरोग्य मंत्री बोलतील, असंही ते म्हणाले. रशियाने डब्ल्यूएचओवर टीका केली आहे. तैवाननेही टीका केली आहे. ट्रम्प यांनीही टीका केली. अमेरिका तर आपला मित्र आहे. त्यामुळे भाजपने माझ्या विधानाला पाठिंबा द्यावा, असा चिमटाही त्यांनी काढला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!