स्थैर्य, दि.२६: बिहारमध्ये भाजपचे सरकार आले तर राज्यातील संपूर्ण जनतेसाठी कोरोनाची लस मोफत देण्यात येईल अशी घोषणा भाजपच्या घोषणापत्रात केली. या घोषणेवर विरोध पक्षाने तीव्र आक्षेप घेतला आहे. निवडणूक असलेल्या राज्याला मोफत लस देण्याचे आश्वासन इतर राज्यांसोबत भेदभाव आहे. या दरम्यान देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत व्हॅक्सीन दिली जाईल असा दावा केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी केला आहे.
मात्र, सारंगी यांनीही निवडणूक बैठकीतच हा दावा केला. ओडिशाच्या बालासोरमध्ये 3 नोव्हेंबरमध्ये पोटनिवडणूक आहे. यासाठी सारंगी रविवारी बैठकीसाठी तेथे पोहोचले. त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, देशातील सर्व नागरिकांसाठी लस उपलब्ध करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा केली आहे. प्रत्येक नागरिकाच्या लसीकरणासाठी सुमारे 500 रुपये खर्च येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
ओडिशाच्या मंत्र्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडून मागितले होते स्पष्टीकरण
ओडिशाचे अन्नपुरवठा व ग्राहक कल्याण मंत्री आर.पी. स्वाइन यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सारंगी यांनी देशभरात मोफत लस देण्याविषयी सांगितले. बिहारमधील मोफत लसी देण्याच्या आश्वासनानंतर ओडिशाबाबत भाजपची काय भूमिका आहे यावर स्वाइन यांनी केंद्रातील ओडिशाचे दोन्ही मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि प्रताप सारंगी यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले होते.
अनेक राज्य सरकारांनी मोफत लस देण्याची घोषणा केली आहे
तमिळनाडू, मध्य प्रदेश, आसाम आणि पदुच्चेरी या राज्यांनी आधीच आपल्या लोकांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संपूर्ण देशासाठी मोफत व्हॅक्सीनची मागणी केली आहे.