
दैनिक स्थैर्य | दि. ०६ फेब्रुवारी २०२३ | फलटण | बिबवी, ता. फलटण येथील वडगाव रोड टाकाजवळ विकास बोबडे यांच्या घराजवळ असलेल्या शेतामधील विहिरीत दुर्मिळ असलेले रानमांजर पडले होते. त्यास वनविभाग व प्राणीमित्रांनी सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले आहे.
याबाबत माहिती अशी, बिबवी येथील विकास बबन बोबडे यांच्या घराजवळ त्यांच्या मालकीची विहीर आहे. बोबडे हे शेतात काम करत असताना जवळच्या असलेल्या त्यांच्या विहिरीमध्ये दुर्मिळ असलेला वन्यप्राणी रानमांजर पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ याची माहिती वनविभागास दिली.
रानमांजर विहिरीत पडल्याची माहिती मिळताच वनपाल राजेंद्र आवारे, वनरक्षक बी.आर. भोये, सहायक वनमजूर आबा जाधव, सुभाष जाधव तसेच प्राणीमित्र व अभ्यासक गणेश धुमाळ, महेश दंगेकर, धीरज भोसले व श्रषिकेश शिंदे हे तेथे पोहोचले. त्यांनी पाहणी केली असता रानमांजर अन्नाच्या शोधात विहिरीत पडल्याचे दिसले. त्यानंतर सर्वांनी त्या रानमांजरास विहिरीतून सुखरूप बाहेर काढले.
रानमांजर दुर्मिळ वन्यप्राण्यात मोडते. येथे सापडलेले रानमांजर मादी जातीचे असून त्याचे वजन अंदाजे अडीच ते तीन किलोग्राम असल्याचे वनविभाग व अभ्यासकांनी सांगितले.