रामायण, महाभारतातील जीवनमूल्य छत्रपती शिवरायांच्या चरित्रात – गोविंद देवगिरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १९ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
आपल्या धार्मिक परंपरेतील रामायण, महाभारत यामध्ये जी जीवनमूल्य सांगितली आहेत, ती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात तंतोतंत आढळतात. धर्म जपण्यासाठी अनेक ग्रंथ वाचू नका, तर प्रभू श्रीरामाला समजून घ्या. रामासारखे वागण्याचा प्रयत्न करा. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन अभ्यासताना ते किती विलक्षण आहे व त्यांची स्तुती किती करावी हे सांगण्यास शब्दच नाहीत. धर्माची पहिली आवृत्ती श्रीराम असून त्यानंतरची आवृत्ती हे छत्रपती शिवराय आहेत. हे मी फार जबाबदारीने बोलत आहे, मी कुठे बोलतोय व कोणापुढे बोलतोय याचे मला भान आहे. संपूर्ण जीवनात छत्रपती शिवरायांद्वारे कोणतीच चूक दिसत नाही. काम, क्रोध, लोभ, मदाचे एकही लेश त्यांच्या जीवनात दिसत नाहीत. पुरुषार्थाचे जीवन राम जगले, असेच जीवन छत्रपती शिवरायही जगले, असे गौरवोद्गार अयोध्या श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष परमपूज्य गोविंद देवगिरी महाराज यांनी सज्जनगड येथे काढले.

सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाचे वतीने आयोजित केलेल्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त शनिवारी दुपारी उपस्थित समर्थ भक्तांपुढे बोलताना गोविंद देवगिरी बोलत होते.

देवगिरी पुढे म्हणाले की, छत्रपती शिवरायांची स्तुती स्वतः समर्थांनी केली. जाणता राजा काय असावा, हे त्यांच्या चरित्राकडे पाहिल्यावर समजून येते. सध्या शिवचैतन्य जागरण यात्रा सुरू केली असून यावेळी गोविंद देवगिरी यांनी उपस्थित सर्वांकडून शिवस्तुतीचे गायन करून घेतले.

परकियांनी छत्रपतींची निंदाच केली. पापी, परकियांनी जे चरित्र दिले ते समाजापुढे आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र, खुद्द स्वामी विवेकानंदांनी तमिळनाडूमध्ये कार्यकर्त्यांनी छत्रपतींबाबत ‘दरोडेखोर’ असा केलेला उल्लेख पूर्णपणे क्रोधित होऊन खोडून काढत सर्वांनी छत्रपतींचे चरित्र नीट जाणा, असे सांगितले होते. खुद्द स्वामी विवेकानंदही कवी भूषण यांनी केलेली कविता ते स्वतः अनेकदा गुणगुणत असत. आज छत्रपतींची कथा धार्मिक व्यासपीठावरून चर्चिली गेली पाहिजे, असा ठाम आग्रह यावेळी गोविंद देवगिरी यांनी केला.


दरम्यान, आपण धर्म जपण्यासाठी अनेक ग्रंथ वाचू नका तर रामरायाला समजून घ्या, त्यांच्यासारखे वागण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे आपोआपच आपण धर्मनिष्ठ होऊन जाऊ आणि धर्माचे सरकार व्हायचे ठरवले तेव्हा त्रेतायुगात रामराया अवतरले आणि कलियुगात खुद्द छत्रपती शिवाजी महाराज अवतरले, असेही त्यांनी सांगितले.

सज्जनगडावर आयोजित या अमृत महोत्सवी सोहळ्यामध्ये शनिवारी सकाळी वाराणसी येथील गणेशशास्त्री द्रविड यांचे मार्गदर्शनपर प्रवचन झाले. त्यानंतर अयोध्या येथील श्रीराम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष व श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा न्यासाचे मुख्य प्रवर्तक श्रीमद परमपूज्य गोविंद देवगिरी महाराजांचे सज्जनगडावर आगमन झाल्यावर ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सज्जनगड समर्थ सेवा मंडळाचे वतीने त्यांची नाणीतुला करण्यात आली.

ही तुला संपन्न होताना स्वामीजींना त्यांच्या जन्मतारखेच्या अनुसार क्रमांक असलेल्या विविध नोटांचे केलेले आकर्षक मानपत्रही मंडळाचे वतीने प्रदान करण्यात आले. विविध प्रकारच्या नाण्यांनी त्यांची तुला करताना मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ महाराज कोटणीस, रामदास स्वामी संस्थानचे विश्वस्त प्रसाद स्वामी, वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले, ज्येष्ठ निरुपणकार मंदाताई गंधे, मंडळाचे कार्यवाहक योगेशबुवा रामदासी आदींची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन समर्थभक्त मकरंदबुवा रामदासी यांनी केले.

यावेळी श्री समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष कोटणीस महाराज यांच्या हस्ते गोविंदगिरी यांचा शाल, श्रीफळ, रामनवमी, राम मंदिराची प्रतिकृती आणि नोटांचे सन्मानपत्र देऊन सत्कार केल्यानंतर शांतीनिमित्त तुलाभार पूजन करण्यात आले आणि त्यानंतर स्वामींना तुलेमध्ये बसवून गंगालयात विविध नाणी टाकून त्यांची तुला करण्यात आली. यावेळी योगेशबुवा रामदासी यांनी स्वामींचा पुष्पहार घालून सत्कार केला. यावेळी ‘जय जय रघुवीर समर्थ, प्रभू श्रीरामचंद्र की जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय..’च्या जयजयकाराने परिसर दुमदुमून गेला होता.

या कार्यक्रमात सज्जनगड येथे उभारण्यात आलेल्या अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीचे निर्माणकर्ते समर्थ सेवा मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आणि कार्यकर्ते जयेशभाई जोशी व ज्या कलाकारांनी यासाठी तब्बल दीड महिना अहोरात्र परिश्रम घेतले असे मुंबई येथील हेमंत उपाध्याय व सुनील निमकर या कलाकारांचा सत्कार स्वामी गोविंद देवगिरी यांच्या हस्ते करण्यात आला.

अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त सज्जनगड येथे मंदिर, पेठेतील मारुती समर्थ सेवा मंडळाचे कार्यालय आणि इतर भक्तनिवाससारख्या इमारतींना केलेली विद्युत रोषणाई अक्षरशः लक्षवेधक ठरत आहे. सज्जनगडच्या समाधी मंदिरात ठाणे येथील संतोष बल्लाळ यांनी काढलेली रामदास स्वामींच्या चरित्रातील लग्नसमारंभाची विविध रंगांची रांगोळी ही अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे.

मुंबई येथील विशेष कलाकारांनी संपूर्ण सज्जनगडावर केलेली विविध देशी-विदेशी फुलांची आकर्षक सजावट स्वागतकमानी आणि हार तसेच बहुरंगी फुलांनी सजलेले मंडप विशेष लक्ष वेधून घेणारे ठरत आहेत.

समर्थ सेवा मंडळांने या महोत्सवाचे सर्व धार्मिक कार्यक्रम, व्याख्याने, प्रवचने, कीर्तने, संगीत-गायन सेवांचे चित्रीकरण युटुब चॅनलवर समस्त देशातील तसेच प्रदेशातील समर्थ भक्त कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत. तसेच ड्रोन कॅमेरेद्वारे या सर्व कार्यक्रमाचे चित्रीकरण विशेष लक्ष वेधून घेणारे ठरत आहे.


Back to top button
Don`t copy text!