दैनिक स्थैर्य । दि. १६ जून २०२२ । सातारा । व्यावहारिक जीवन जगत असताना चांगल्या भाषिक संवादाची गरज आहे ,तसेच विश्वासू वर्तनाची देखील गरज आहे. आयुष्यात परंपरेतील सद्गुण घेणे आवश्यक असले तरी परंपरेतील अनिष्ट चालीरीती सोडून देत विधायक आधुनिकतेचा स्वीकार आवश्यक आहे.अनेक अनिष्ट प्रवृत्ती या माणसाच्या उद्यमशीलतेला अडचणी निर्माण करतात. काम करताना नवनवीन येणारे तंत्रज्ञान आपण आत्मसात करायलाच हवे नाहीतर काळाबरोबर असणारी गती आपल्याला पकडता येणार नाही. म्हणून नवे काय येत आहे,ते किती उपयुक्त आहे याचा अभ्यास सतत करायला हवा. शिक्षणातून घेतलेले ज्ञान हे व्यावहारिक जीवनात वापरून स्वतःचे व समाजाचे भले करायला हवे.शील चांगले ठेवून व जीवनउपयोगी व्यावसायिक कौशल्ये घेऊन आयुष्य समाधानी बनवावे असे विचार छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले. ते बी.ए व एम.ए.च्या विद्यार्थी शुभेच्छा समारंभात बोलत होते. प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांचे मार्गदर्शनाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास डॉ.कांचन नलवडे,प्रा.गजानन चव्हाण,प्रा.डॉ.संजयकुमार सरगडे,व प्रा.प्रियांका कुंभार हे विभागातील प्राध्यापक उपस्थित होते.
वेळ व विश्वास व सदुपयोग करण्याविषयी सांगताना म्हणाले की ‘ काहीच हिताचे काम न करता नुसता दिवस वाया घालविणे उपयोगी ठरणार नाही. प्रत्येक दिवशी ज्ञान ,पैसा,कौशल्य ,प्रेम ,प्रेरणा यातील काही न काही मिळवून स्वतःसाठी,कुटुंबीय यांचेसाठी व समाजासाठी काही केल्याचा आनंद घ्यावा.आळसाने कार्यनाश होतो. कामातील सातत्य,निष्ठा व नाविन्य या मुळे माणसाचे मूल्य वाढत राहते.आयुष्यभर निर्व्यसनी रहावे.विश्वासाने व वेळेत केलेले काम हे व्यक्तित्व उन्नत करते. कॉलेजच्या अभ्यासाबरोबर हितकारक गोष्टी घडवून आणण्याचा अभ्यास देखील जाणीवेने करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ.कांचन नलवडे यांनी काम पद्धतशीर करण्याची सवय लावावी असे सांगून विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक व्हावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या.प्रा.गजानन चव्हाण यांनी ग्रामीण भागातील मुलांना अनेक अडचणी असतात याचे भान सर्वांनी ठेवायला हव,प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे असून तरीही ध्येय हे आशावादी राहून पूर्ण करावे असे सांगितले. प्रा.संजयकुमार सरगडे यांनी लेखणी आणि वाणी याचा जीवनात सदुपयोग करणे महत्वाचे असल्याचे सांगितले.प्रा.प्रियांका कुंभार यांनी याच कॉलेजमध्ये शिक्षण मिळाल्याने नेट,किंवा अन्य परीक्षेत भरीव यश मिळाल्याचे सांगून शिक्षकाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.या कार्यक्रमात सोनाली जाधव,राहुल कांबळे,उदयराज फाळके,ऋत्विक शेलार,निवृत्ती चव्हाण ,स्नेहल गोरे इत्यादी विद्यार्थ्यांनी मनोगतात कॉलेजमधील शिक्षण घेताना आनंद आणि ज्ञान मिळाले अशा भावना केल्या.विद्यार्थ्यांनी मराठी विभाग ग्रंथालयास ग्रंथभेट दिली. बी.ए.एम.ए.मराठी विद्यार्थ्यांना विभागातर्फेआनंदमयी शुभेच्छा देण्यात आल्या.