दैनिक स्थैर्य । दि.०३ फेब्रुवारी २०२२ । सातारा । कोयना धरणाचे बॅक वाटर असणाऱ्या शिवसागर जलाशयायातून जीवघेणा प्रवास करणाऱ्या शाळकरी मुलांची विदारक परिस्थिती समोर आल्यानंतर महिला आयोगासह न्यालयही अलर्ट झाले. तथापि, शासनस्तरावर सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने अंमलबजावणी झाली नाही. सातारचे सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी मात्र उत्तम दर्जाचे सेफ्टी लाईफ जॅकेट प्रत्यक्ष त्या मुलांच्या शाळेत जाऊन त्यांना भेट दिले. या जॅकेटमुळे असुरक्षित विद्यार्थ्यांना सुरक्षा कवच प्राप्त झाले असून दुर्गम भागातील या विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुलून गेले आहेत.
खिरखंडी हे गाव शिवसागर जलाशयाच्या पलिकडे असून ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्प गाभा क्षेत्रात येते. येथील मुलांना गेली अनेक वर्षापासून शिक्षणासाठी जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे. या गावात फक्त पाचवीपर्यतचीच शाळा असून पुढच्या शिक्षणासाठी मुलांना शिवसागर जलाशयातून विनायकनगर शेंबडी मठ असा प्रवास करावा लागत आहे. वादळ, वारे, पाऊस याची तमा न बाळगता खिरखंडीतील ही मुले स्वतः होडी वल्हवत जा ये करत असतात. खरंतर, ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आणि चिंताजनक अशा स्वरुपाची असल्याने या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची जबाबदारी शासनासह समाजातील सर्व घटकांनी स्वातःच्या खांद्यावर पेलायला हवी. नेमाक्या याच सामाजिक बांधिलकेच्या भावनेतून सुहास राजेशिर्के यांनी प्रत्यक्ष या मुलांची भेट घेतली.
माजी आमदार जी.जी. कदम प्रतिष्ठाण संचलित न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मोहाट – अंधारी येथील प्राचार्य सिताराम गंगाराम पडगे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंधारी येथील मुख्याध्यापक संतोष कदम यांच्याशी चर्चा करून एकूण परिस्थिती जाणून घेतली. डोंगराळ – दुर्गम भागातील मुलांना शालेयस्तरावरील सर्व प्रकारच्या सेवासुविधा मिळायला हव्यात. सातारच्या जिल्हाप्रशासनाने तसेच मंत्रीमहोदयांनी याकडे माणूसकीच्या भूमिकेतून सहानुभूतीने लक्ष घालावे, अशी अपेक्षा सुहास राजेशिर्के यांनी यादरम्यान व्यक्त केली. सरकार त्याच्या परीने प्रयत्न करेल तेव्हा करेल परंतु ज्यांना शक्य आहे अशा समाज घटकांनी या मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी पुढे यायला हवे. मला जे शक्य आहे ते मी केले आहे. मी खूप काही वेगळे केले असे अजिबात नाही, तर माझे मी कर्तव्य पार पाडले आहे. भविष्यातही या दुर्गम भागातील मुलांच्या अडचणीच्या काळात माझी साथ कायम राहील असा विश्वासही यावेळी सुहास राजेशिर्के यांनी तेथील लोकांना दिला. जॅकेट वितरणानंतर विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला, तर शिक्षकांनी सुहास राजेशिर्के यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.