जिल्ह्यातील 9 खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित

कृषी विभागाची कारवाई; पथकाच्या तपासणीत साठ्यामध्ये तफावत


स्थैर्य, सातारा, दि. 12 ऑगस्ट : राज्यात काही भागांत कृत्रिमरीत्या खत टंचाई निर्माण करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कृषी विभागाने 310 खत विक्रेत्यांची तपासणी केली. या वेळी पॉस मशिनचा वापर न करता खतांची प्रत्यक्ष विक्री केल्याचे दिसून आल्यामुळे प्रत्यक्ष व पॉस मशिनवरील खतसाठ्यात तफावत आढळून आली. आतापर्यंत कृषी विभागाने 9 खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले असून, उल्लंघन करणार्‍या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीजिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे यांनी दिली.

जिल्ह्यात कृषी विभागाने खत विक्रेत्यांची तपासणी मोहीम सुरूकेली आहे. खताची विक्री करताना प्रत्यक्ष साठ्यात तफावत आढळून आल्यास कडक कारवाई केली जाणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 310 खत विक्रेत्यांची तपासणी पूर्ण करण्यात आली असून, काही ठिकाणी पॉस मशिनचा वापर न करता खतांची प्रत्यक्ष विक्री केल्याचे दिसून आले आहे. यामुळे प्रत्यक्ष व पॉस मशिनवरील खतसाठ्यात तफावत आढळून आली. याबाबत संबंधित विक्रेत्याकडून खुलासे मागविण्यात आले आहेत. सन 2017पासून अनुदानित खताची विक्री ही पॉसमशिनद्वारे करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

यामध्ये शेतकर्‍यांना खत विक्री करताना आधार लिंक करणे बंधनकारक असून, याशिवाय खत विक्री करता येणार नाही. मात्र, काही ठिकाणी त्याचे उल्लंघन होत असल्यामुळे कृषी विभागाने आतापर्यंत नऊ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले आहेत. यापुढेही याचे उल्लंघन करणार्‍या विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती श्री. ननावरे यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!