तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी ग्रंथालयांनी वाचन संस्कृतीची चळवळ उभी करावी – विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०३ एप्रिल २०२२ । सातारा । तरुणांमध्ये वाचनाची आवड दिवसें-दिवस कमी होत आहे. वाचनामुळे ज्ञान मिळते. वाचन संस्कृती वाढावी यासाठी ग्रंथालयांनी एक चळवळ उभी करावी, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

श्री. छत्रपती शिवाजी वाचनालय, फलटण शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष, सातारा जिल्हा ग्रंथालय संघाचे 48 वे अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा फलटण येथील महाराजा मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. या अधिवेशनाचे उद्घाटन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या अधिवेशनास आमदार दिपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते, ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले, महानंदा डेअरीचे उपाध्यक्ष डी. के. पवार, पुणे विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रा. यशवंत पाटणे, अरविंद निकम, विजय शिंदे, निलम लोंढे पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संभाजी पाटणे, विजय लोंढे आदी उपस्थित होते.

वाचन संस्कृती वाढली पाहिजे, वाचनामुळे ज्ञान मिळते, ज्ञानामुळे मत मांडता येते. वाचन संस्कृती खेडोपाडी वाढविण्यासाठी ग्रंथालयांनी पुढाकार घ्यावा. तरुण समाजमाध्यमांचा खुप मोठा वापर करत आहेत. ई-बुक सारखे ॲप आहे. या ॲपमध्ये मोठ्या प्रमाणात पुस्तके उपलब्ध आहेत. याचाही वापर तरुणांनी करुन आपले ज्ञान वाढवावे.

समाज बदलत आहे त्याप्रमाणे ग्रंथालयांनी आपले आधुनिकीकरण करावे. जास्तीतजास्त तरुण वर्ग ग्रंथालयात वाचनासाठी कसा येईल यासाठी प्रयत्न करावेत. ग्रंथालयांच्या काही अडीअडचणी असतील त्या शासनाकडून सोडविल्या जातील अशी ग्वाहीही विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली

या अधिवेशनात विविध ग्रंथालयांना पुरस्काराचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास साहित्यिक, विविध ग्रंथालयांचे अधिकारी –कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!