दैनिक स्थैर्य | दि. ०४ नोव्हेंबर २०२१ | फलटण | राज्यातील ज्येष्ठ पत्रकार व वृत्तपत्रांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करु, असे आश्वासन महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
येथील साप्ताहिक ‘लोकजागर’च्या दिपावली विशेषांकाचे प्रकाशन ‘लोकजागर’ कार्यालयात ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते व फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. त्यावेळी उपस्थित पत्रकार व वृत्तपत्र संपादकांशी संवाद साधताना ना.श्रीमंत रामराजे बोलत होते. यावेळी ‘लोकजागर’चे संस्थापक तथा महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, सुभाष भांबुरे, शामराव अहिवळे, स.रा.मोहिते, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे प्रशासकीय संचालक अमर शेंडे, संचालक अॅड.रोहित अहिवळे, फलटण तालुका वृत्तपत्र संपादक संघाचे अध्यक्ष विशाल शहा, उपाध्यक्ष बापुराव जगताप, सेक्रेटरी रोहित वाकडे, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, सौ.प्रगतीताई कापसे आदींची उपस्थिती होती.
राज्यशासनाने कोरोना प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर वृत्तपत्र व्यवसायिकांना आर्थिक मदत करावी, वृत्तपत्रांच्या पडताळणीतील अटींमध्ये शिथीलता आणावी, शासकीय संदेश प्रसारण नियमावलीप्रमाणे जाहिरातींचे वितरण व्हावे, पत्रकारांना देण्यात येणार्या आरोग्य विषयक सुविधांमध्ये व्याप्ती आणावी, निवृत्त ज्येष्ठ पत्रकारांच्या मानधनात वाढ करुन पात्रतेसंबंधीच्या निकषांत शिथीलता आणावी, अधिस्वीकृती पत्रिकेच्या नियमांमध्ये बदल व्हावेत, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या टपाल तिकीटासाठी शासनातून प्रयत्न व्हावेत, फलटण येथे उपजिल्हा माहिती कार्यालय सुरु करावे आदी विविध मागण्यांचा समावेश असलेले सविस्तर निवेदन फलटण तालुका वृत्तपत्र संपादकांच्यावतीने यावेळी ना.श्रीमंत रामराजे यांना देण्यात आले. त्यावर सदर प्रश्नांसंदर्भात संबंधित खात्याचे मंत्री व अधिकार्यांसमवेत विधानभवन येथे लवकरच बैठक आयोजित करु, असेही ना.श्रीमंत रामराजे यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी ना.श्रीमंत रामराजे व आमदार दीपक चव्हाण यांचे स्वागत रविंद्र बेडकिहाळ यांनी केले. त्यानंतर ‘लोकजागर’ च्या 42 व्या दिपावली विशेष अंकाचे प्रकाशन ना.श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते संपन्न झाले. ‘लोकजागर’ च्या दर्जेदार व सातत्यपूर्ण दिवाळी अंकाचे कौतुक यावेळी ना.श्रीमंत रामराजे व आमदार दीपक चव्हाण यांनी आवर्जून करुन सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. उपस्थितांचे आभार भारद्वाज बेडकिहाळ यांनी मानले.