दैनिक स्थैर्य । दि.२१ नोव्हेंबर २०२१ । पुणे । सहकार क्षेत्रातील अडीअडचणी सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले.
राष्ट्रीय सहकार सप्ताह निमित्ताने मंचर येथील शरदचंद्र पवार सभागृहात आयोजित खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील नागरी सहकारी पतसंस्थेच्या परिषदेप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, पुणे जिल्हा सहकारी सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, पुणे जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संचालक यतीनकुमार हुले आदी उपस्थित होते.
श्री. वळसे-पाटील म्हणाले, सहकारी पतसंस्था ह्या सर्वसामान्य नागरिकांच्या संस्था असून नागरिकांच्या गरजा भागविण्याचे काम करतात. सहकारी संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न केला जातो. सहकारी संस्थांनी आजपर्यंत उत्तम काम करत गरजेनुसार नागरिकांना मदत केलेली आहे. सहकार क्षेत्रातील सर्व प्रकारच्या अडीअडचणी शासन दरबारी मांडून आवश्यक तेथे सहकार कायद्यात, शासन निर्णयात अनुकूल बदल करण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.