पतसंस्था मधील ठेवीना विमा संरक्षण देण्याबाबत प्रयत्न करु – उपमुख्यमंत्री अजित पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ९ मे २०२२ । लोणंद । बँका बुडाल्या तरी ग्राहकांना त्यांच्या ठेवीवर विमा कवच मिळते तसेच सहकारी  पतसंस्थांच्या ग्राहकांना विमा संरक्षण मिळावे यासाठी सहकार विभागाने सखोल अभ्यास करुन अहवाल तयार करावा.  या अहवालावर शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

लोणंद येथील मराठा नागरी सहकारी पतसंस्थेच्या नुतन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.  या उद्घाटन प्रसंगी  विधानपरिषदचे सभापती रामराजे नाईक -निंबाळकर, सहकार व पणनमंत्री तथा   पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिलराजे निंबाळकर,  उपाध्यक्ष हणमंत यादव आदी उपस्थित होते.

यावेळी श्री पवार म्हणाले, मराठा नागरी पतसंस्थेचे काम लोणंद परिसरात चांगले सूरु आहे.  ग्राहकांना डिजीटल सेवा देण्यावर भर द्यावा. पतसंस्थेची नुतन इमारत लोणंदच्या वैभवात भर घालणारी आहे.  इमारतीमधील मांडणी खूप चांगल्या पध्दतीने करण्यात आली आहे.  संस्था काढणे सोपे आहे, ती चालवणे, नावारुपाला आणणे व नागरिकांमध्ये विश्वासार्हता निर्माण करणे। महत्त्वाचे आहे.  मराठा नागरी पतसंस्थेने ज्यांची पत नाही त्यांना आर्थिक पुरवठा करुन पत निर्माण करण्याची संधी उपलब्ध करुन द्यावी.

कोरोनाचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे व्यवसाय सुरु झाले आहेत.  कोरोना संकटाच्या काळात आरोग्य सुविधा वाढविण्यात शासन यशस्वी झाले आहे.  लोणंदच्या विकासासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला जाईल.  यातून लोणंदच्या परिसराचा कायापालट करावा, असेही श्री.पवार यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, कोरोनाच्या संकटातही पतसंस्था टिकून राहिलेल्या आहेत.   या संस्थांना सहकार विभागाची सहकार्य करण्याची भूमिका राहिली आहे.  संकट काळात सहकार विभागामार्फत सहकारी संस्थांना दिलासा देण्याचे काम केले आहे.  महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले  आहे.  जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांच्यासाठीही अर्थ संकल्पात  तरतूद करण्यात आली असून  त्यांनाही दिलासा देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, लोणंद गामस्थ, मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!