मन असो किंवा मिठाई,
जर गोडवा नसेल तर माणूसच काय, मुंगीसुद्धा जवळ येत नाही.
मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकल हाकल फिर पिकावर येत असे हे भटकंती करणारे मन शरीररुपी रथाचे चालक आहे.मनात काय काय येत? अहो मनात काय येत नाही?हे विचारा.मनातील बोल कसं असावं. ग्वाड की द्वाड.तुम्ही म्हणाल ,” ग्वाड बोलून लोक गैरफायदाच जास्त घेतात?” तुमचं मला मान्य आहे.फायदा अन् गैरफायदा जो जसा घेतो.त्याला तसंच फळ मिळतं म्हणून आपलं आपण मिठाई सारखं गोड असावं.
आपल्याला भगवंताने अनमोल अशीच वाणी दिली आहे.जगत् गुरू संत तुकाराम महाराजांची अभंगवाणी व बोल गुळापरीस गोड होती.म्हणूनच माणसंच नव्हे तर चराचर त्यांच्या वाणी व अभंग यावर भुलून जाते.
आपल्या वागण्यात बोलण्यात गोडवा असावा.मनातील गोडव्याने दुरावलेले नातेसंबंध जवळ येतात.गोडव्याने रानच पाखरू आपलं होतं. अन् गोडवा नसला की आपलंच परकं होत.
मनातील गोडवा नसेल तर कोणीच जवळ येणार नाही.अफाट धनसंपत्ती असूनही आपण शब्दरूपी गोडवा वाटत नसेल तर उपयोग काय? मुंगीला सुद्धा गोडवा सांगावा लागत नाही.ती आपोआप शोधून चाखण्याची कामगिरी करते.
आपणही दुस-यातील गोडवा शोधून काढावा.कडवटपणाने माणसं दुरवतात.गोडवा फक्त स्वार्थापुरता नसावा.प्रसंगी आपला फायद्या तोटा न बघता कायमस्वरुपी गोडवा जवळ असावा.पण ऊस गोड लागल्यावर मुळासकट खाऊ नये.