दैनिक स्थैर्य । दि. १७ सप्टेंबर २०२२ । मुंबई । विद्यार्थी हितासाठी आणि शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येतील, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या मागण्यासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षक विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, अखिल भारतीय शैक्षिक महासंघाचे अध्यक्ष प्रा. प्रदीप खेडकर, महासचिव प्रा. डॉ. वैभव नरवडे महासंघाचे राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
उच्च शिक्षण हे देशाच्या प्रगतीचे आणि विकासाचे साधन म्हणून पाहिले जाते. देशाच्या विकासात उच्च शिक्षणाचे सर्वाधिक महत्त्व आहे. राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा अधिक वाढवा, दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध झाले पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. महासंघाच्या मागण्यांबाबत शासनस्तरावर सर्वांची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.