यंदा कोरोनाला हरविण्याच्या संकल्पाची गुढी उभारुया – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, चंद्रपूर, दि. १३: मराठी नववर्षाच्या स्वागतावर कोरोनाचे सावट असल्याने गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी घराबाहेर जाऊ नका, घरात उपलब्ध साहित्यामध्ये सण साजरा करा, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापनमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले असून गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

गुढीपाडव्याचे स्वागत करण्यासाठी दारावर तोरण हमखास लावले जाते. त्याशिवाय गुढी उभारून तिला साखरगाठ्यांची माळ घातली जाते. सोनेखरेदी, कपडे खरेदीही केली जाते. मात्र, या खरेदीसाठी यंदा घराबाहेर पडू नये, असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन गुढीपाडव्याला खरेदीसाठी बाहेर जाऊ नका, खरेदीसाठी रस्त्यावर गर्दी केली तर शासनाच्या वतीने कोरोनापासून संरक्षणासाठी उचलण्यात येत असलेल्या कठोर उपाययोजनांचा उपयोग होणार नाही, याचीही जाणीव त्यांनी करून दिली आहे.

यंदा मराठी नववर्षाच्या स्वागतावर कोरोनाचे सावट असले तरी घरोघरी गुढ्या उभारल्या जातीलं, परंतु शोभायात्रांचं आयोजन व सामूहिक आयोजन टाळण्याचं आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.

ना. विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की साखरेच्या गाठी स्वतःच घरी तयार करा, ‘घरात उपलब्ध साहित्यामध्ये सण साजरा करा मात्र बाजारात गर्दी करू नका’. बत्ताश्यांऐवजी घरातच गोड पुऱ्या करून त्यांचा हार गुढीला घालता येईल. पूर्वी घरोघरी श्रीखंड घरातच तयार करत असत. तोच कित्ता पुन्हा गिरवता येईल, अशा आठवणीही त्यांनी जागवल्या. नागरिकांनी यंदा ‘कोरोना’ला हरविण्याच्या संकल्पाची गुढी उभारावी, असं आवाहनही मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागरिकांना केलं आहे.


Back to top button
Don`t copy text!