छत्रपतींची परंपरा प्राणापलीकडे जाऊन जपू – निरंजन टकले


सातारा – संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार करताना निरंजन टकले, डॉ. भारत पाटणकर, कॉ. धनाजी गुरव, अ‍ॅड. सुभाष बापू पाटील, पद्मश्री लक्ष्मण माने, हभप डॉ. सुहास फडतरे, अ‍ॅड. वर्षा देशपांडे व विजय मांडके.
स्थैर्य, सातारा, दि. 24 डिसेंबर : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि शाहू महाराजांची यांची सर्व धर्मांना, सर्व जातींना बरोबर घेऊन जायची परंपरा मोडकळीस आणणे हे मनूवाद्यांचे पहिले टार्गेट आहे. पण छत्रपतींची परंपरा जपणं पहिले टार्गेट विद्रोहीसह आपल्या सर्वांचे आहे. आपण प्राणापलीकडे जाऊन छत्रपतींची परंपरा जपूया असे विचार ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक निरंजन टकले यांनी मांडले. शेतकर्‍यांची दुःख, स्त्रियांचे प्रश्नांवर सत्याची बाजू घेऊन लिहिताना अभिजन वर्गातील साहित्यिक दिसत नाहीत, असा हल्लाबोल निरंजन टकले यांनी चढवला.

निरंजन टकले सातारा येथे होणार्‍या पंधराव्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या पार्श्वभूमीवर सातारा येथे दैवज्ञ सांस्कृतिक भवन येथे घालमोडे दादांचे साहित्य संमेलन व आमची भूमिका या विषयावरील व्याख्यानात बोलत होते. याचं आयोजन विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र व शिव, फुले, शाहू , आंबेडकरी विचारांच्या संघटना , सातारा जिल्हा यांच्यावतीने करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी पुणे येथे झालेल्या 14 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष डॉ भारत पाटणकर होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री उपराकार लक्ष्मण माने , विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष कॉ.धनाजी गुरव , ड. सुभाष पाटील , ह. भ. प. डॉ सुहास महाराज फडतरे , तसेच ड .वर्षा देशपांडे, आयु. गणेश भिसे, प्राचार्य डॉ. अरुण गाडे, ड. राजेंद्र गलांडे, ड. दयानंद माने, डॉ. प्रशांत पन्हाळकर, नारायण जावळीकर यांची उपस्थिती होती.

निरंजन टकले यांनी यावेळी बोलताना सातारा येथे होणार्‍या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी त्यांच्या लेखनात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अश्लाघ्य भाषेत लिहून त्यांची बदनामी केल्याचा दाखला दिला. छत्रपतींच्या वारसदारांनी खरे तर छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणार्‍या विश्वास पाटील यांना याचा जाब विचारायला हवा होता तर तेच स्वागताध्यक्ष झाले आहेत, असेही टकले यांनी म्हटले.

निरंजन टकले यांनी आपल्या भाषणात अनेक दाखले देत महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या हजारो शाळा बंद करून ग्रामीण भागातल्या भावी पिढीचे शिक्षण सरकारने बंद केले आहे. याबद्दल या तथाकथित साहित्यिकांनी लेखन केले आहे काय असा सवाल केला आहे. आजच्या साहित्यिकांनी संविधानिक कर्तव्य बजावली पाहिजेत, वैज्ञानिक दृष्टिकोन जपला पाहिजे ते होताना दिसत नाही असे निरंजन टकले म्हणाले. मराठी शाळा आणि भाषांच्या लढ्यात साहित्यिक, कलावंत उतरत नाहीत. मुलं मराठी शिकलीच नाहीत तर तुमची पुस्तकं कोण वाचणार, चित्रपट कोण पाहिलं, असा परखड सवाल देखील निरंजन टकले यांनी केला.महात्मा फुले यांनी मराठी ग्रंथकार सभेस उद्देशून लिहिलेल्या पत्रात साहित्यिकांना घालमोड्या दादा असे म्हटले आहे. त्यांच्याकडून मानवी कल्याणाचे काही होणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. आजच्या ही साहित्यिकांकडून मानवी कल्याणाचे काहीही होणार नाही व ते काहीही करणार नाही त्यामुळे आजही त्या साहित्यिकांना लिहिलेले पत्र तंतोतंत लागू होते, असे परखड विचार जेष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी सातारा येथे बोलताना व्यक्त केले.

विवेकाला पुढे नेण्याचे काम विद्रोहीने यापुढे करावे सर्व समाज ताकदीने विद्रोही बरोबर येईल, असा विश्वास निरंजन टकले यांनी व्यक्त केला. विद्रोही परंपरा ही बुद्ध, चार्वाक, संत नामदेव, संत तुकाराम, महात्मा फुले, संत गाडगेबाबा कबीर यांची आहे. या महामानवांची विद्रोही परंपरा विद्रोही सांस्कृतिक चळवळ पुढे चालवत असल्याचे डॉ. भारत पाटणकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

कॉ. धनाजी गुरव म्हणाले, सातारा येथे होणार्‍या नियोजित 15 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाची मूळ संकल्पना ही प्रतिसरकार आणि लोकशाही मजबूत करण्यासाठीची आहे असे सांगून विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा इतिहास सांगितला. सातारचे आगामी विद्रोही साहित्य संमेलन क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिप्रेत असेच होईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी विचार मंचावरील सर्व मान्यवरांनी हात उंचावून आगामी विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन निर्धाराने व उत्साहाने यशस्वी करण्याचा संकल्प यावेळी जाहीर केला. मिनाज सय्यद यांनी सूत्रसंचालन केले तर आभार विजय मांडके यांनी मानले विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या सातारा येथील कार्यकर्त्यांनी क्रांतीगीते सादर केली. याशिवाय सभागृहात विद्रोहीच्या उपक्रमांबाबत माहिती देणारे फलक लावण्यात आले होते.

 


Back to top button
Don`t copy text!