‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत सहभागी होऊ या…

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ सामान्य नागरिकांना देण्यात येत आहे. या योजनांची माहिती सामान्यांना व्हावी व लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतील ही माहिती या लेखाच्या माध्यमातून देण्यात येत आहे….

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना ही देशातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण विमा योजना आहे. या योजनेतून कमी रक्कमेत विमा संरक्षण देण्यात येते. या योजनेचा कालावधी हा १ जून ते ३१ मे असा आहे. योजनेत सभाभागी झालेल्या विमा धारकाचा १८ ते ५० वर्षीच्या व्यक्तीचे कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास २ लाख रुपये रक्कम मिळतात.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही टर्म पॉलिसी असल्यामुळे ठराविक कालावधीसाठी ही विमा संरक्षण लागू राहते व सदर पॉलिसी धारकाचा या कालावधीत मृत्यू झाला तर त्याला याचा लाभ मिळणार आहे अन्यथा इतर कोणताही लाभ अथवा परतावा त्याला मिळणार नाही.

योजनेची वैशिष्ट्ये

  • एका वर्षाचे विमा संरक्षण असणारी ही एक अपघात व जीवन विमा योजना आहे.
  • दरवर्षी नूतनीकरण आवश्यक असून बँका व भारतीय आयुर्विमा महामंडळ, इतर विमा कंपन्या यांच्या सहयोगाने या योजनेचे परिचालन केले जाते.
  • १८ ते ५० वयोगटातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतील.
  • एकाच व्यक्तीची अनेक बचत खाती असतील तर अशी व्यक्ती कुठल्याही एकाच बचत खात्याद्वारे हा विमा उतरवू शकेल.
  • विमा उतरविणाऱ्या व्यक्तीचा आधार क्रमांक पायाभूत मानला जाईल.
  • ऑटो डेबिट सुविधा उपलब्ध.
  • योजनेचा कालावधि दर वर्षी १ जून ते ३१ मे असा राहील
  • विमा धारकाचा कुठल्याही कारणाने मृत्यू झाल्यास वIरसास रू. 2 लाख भरपाई मिळेल.
  • विमा हप्ता रू. ४३६ /- प्रती वर्ष राहील.
  • विमाधारकाने वय वर्ष ५५ पूर्ण केल्यावर / बँकेच्या बचत खात्यात विमा हप्ता नावे टाकण्यास पुरेशी शिल्लक नसेल तर / बँक खाते बंद केले तर विमा संरक्षण संपुष्टात येईल.
  • तांत्रिक अडचणींमुळे संपुष्टात आलेली विमा पॉलिसी काही अटींची पूर्तता केल्यावर पुन्हा चालू करता येईल.

या योजनेसाठी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँका, सर्व खाजगी बँका व ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यापैकी कोणत्याही बँकेत आपले बचत खाते असल्यास या योजनेचा लाभ घेता येईल. जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर या योजनेचा लाभ देण्यासाठी ३०  जूनपर्यंत मोहिम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी ग्रामपंचायत स्तरावरील या विशेष शिबिराला भेट देऊन योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

०००

संकलन

नंदकुमार ब. वाघमारे,

प्र.जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे


Back to top button
Don`t copy text!