स्थैर्य, कोळकी दि.१२ : कोळकीचा विस्तार होत असताना कोळकीचा समावेश फलटण नगरपालिकेत करण्याची मागणी होत असताना कोळकीला नगरपंचायतीचा दर्जा देवून कोळकीचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवूयात असा निर्णय ना.श्रीमंत रामराजे यांनी घेतला आहे. त्यादृष्टीने येत्या काळात आपल्याला पाऊले टाकायची आहेत, असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
कोळकी ग्रामपंचायत निवडणूकीतील राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजे गटाचे प्रभाग क्रमांक ४ मधील अधिकृत उमेदवार सौ. प्राजक्ता काकडे, सौ. वर्षा शिंदे व गणेश शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत श्रीमंत संजीवराजे बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, ज्येष्ठ नेते दत्तोपंत शिंदे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, सौ. प्राजक्ता काकडे, सौ. वर्षा शिंदे व गणेश शिंदे आदींची उपस्थिती होती.
गेल्या अनेक वर्षांपासून कोळकी ग्रामस्थ ना.श्रीमंत रामराजेंच्या नेतृत्त्वामागे ठामपणे उभे राहिले आहेत. कोळकी गावात झपाट्याने अमुलाग्र बदल झाले आहेत. फलटण शहराची वाढ कोळकीमध्ये व्हावी अशीही मागणी होत असते. गावात मतदारांपेक्षा बाहेरुन येणारे लोक जास्त आहेत. कोळकीच्या समस्यांना सामोरे जाताना त्या योग्य प्रकारे हाताळल्या तर त्यात यश येईल. या ठिकाणी पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. नळ पाणी पुरवठा योजना आपण केली. ही देखील योजना आपल्याला कमी पडणार आहे. त्यात आणखीन सुधारणा करावी लागणार आहे. भूमीगत गटार योजनेसाठी सातारा जिल्ह्यातून कोळकी गावाची निवड झालेली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे या ठिकाणी सुविधा कमी पडतात मात्र ना.श्रीमंत रामराजेंच्या नेतृत्त्वाखाली विकासकामे कशी मार्गी लागतील यादृष्टीने काम करण्याचा आमचा मानस आहे असे सांगून आपल्या सर्व अधिकृत उमेदवरांना आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहनही श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी केले.