राष्ट्रीयता आणि एकात्मता वृद्धीसाठी चला घरोघरी फडकवू या तिरंगा…

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑगस्ट २०२२ । मुंबई । भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे.  या स्वातंत्र्याचे महत्त्व जाणून गेल्या 75 वर्षांत भारताने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणे हा आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. अमृत महोत्सवाचा हा गौरव सोहळा संपूर्ण देशभर आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे.

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतीकारक, स्वांतत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे. स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी व त्याचे संस्मरण व्हावे, या उद्देशाने तसेच राष्ट्रीयता आणि एकात्मता वृध्दीसाठी  केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने दि. 13 ते दि. 15 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये देशभरात “हर घर झेंडा’’  म्हणजेच ‘घरो घरी तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांवर तसेच प्रत्येक घर व इमारतींवर स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वजाची उभारणी करायची आहे. या अनोख्या उपक्रमात भारतीय नागरिक म्हणून आपण सर्वांनीच सहभागी व्हायला हवे. राष्ट्रध्वजाप्रती आदर दाखविण्यासाठी प्रत्येकाने या कालावधीत आपल्या घरावर राष्ट्रध्वज तिरंगा फडकवायला हवा. तसेच हर घर झेंडा या उपक्रमांतर्गत छायाचित्रे, चित्रफिती, ध्वनीमुद्रमण आदी केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाच्या http://harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करुन आपण या अभियानात मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे.

‘हर घर झेंडा’ अर्थात ‘घरो घरी तिरंगा’ अभियान यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग घेण्यात येत आहे. आपल्यामधील असलेले राष्ट्रप्रेम जागृत करण्याचे काम या अभियानाअंतर्गत होणार आहे. राज्यातील शेतकरी, महिला, शाळकरी मुले याबरोबरच स्वयंसेवी संस्था, वेगवेगळ्या सहकारी संस्था या सर्वांचा सहभाग यामध्ये घेतला जाणार आहे. राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर आणि वॉर्ड किंवा ग्रामस्तरीय लोकसहभागातून कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या प्रत्येकाची आठवण आपण ठेवणे हे आपल्या प्रत्येकाचे काम असून आजच्या पिढीला त्यांचे महात्म्य, त्यांचे कार्य आणि विचार समजणे यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘घरो घरी तिरंगा’ हा उपक्रम राज्यात मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्यासाठी प्रशासन कार्यरत आहे. हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, नगरपरिषदा यांच्या माध्यमातून या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी आखणी करण्यात येत आहे.

हिंगोली जिल्ह्यातही प्रत्येक नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन स्वतःचे घर, कार्यालय येथे अभिमानाने तिरंगा फडकवून हे अभियान यशस्वी करायला हवे.

‘घरो घरी तिरंगा’ त्यासाठी काय काळजी घ्यावी, कशा प्रकारे झेंडा असावा, यासंबंधीच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्याचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे.

भारतीय ध्वज संहितेचे काटेकोरपणे अनुपालन व्हावे

राष्ट्रध्वज हा आपली राष्ट्रीय अस्मिता आहे. केंद्रीय गृह विभागाच्या दि. 30 डिसेंबर 2021 रोजीच्या अधिसूचनेन्वये भारतीय ध्वज संहिता 2002 भाग-1 मधील परिच्छेद 1.2 मधील राष्ट्रध्वज हे “हाताने कातलेल्या किंवा विणलेल्या लोकर, सूत, सिल्क, खादी कापडापासून बनविलेला असेल”, या तरतुदीमध्ये बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सूत, पॉलिस्टर, लोकर, सिल्क, खादी पासून बनविलेल्या कापडाचे असावेत, असा उल्लेख केला आहे. या बदललेल्या तरतुदीनुसार तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचा वापर या प्रयोजनासाठी करता येईल. भारतीय ध्वज संहितेचे काटेकोरपणे अनुपालन व्हावे व जाणते-अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये याची दक्षता सर्वांनी घ्यावी व त्यासाठी सातत्याने जाणीवजागृती  निर्माण करावी. तसेच प्लास्टिक ध्वजाचा वापर होऊ नये, यासाठी आपण सर्वांनी कटाक्षाने खबरदारी घेणे गरजेचे आहे.

असा आहे कृती आराखडा

‘घरो घरी तिरंगा’ या उपक्रमाबाबतचा ग्रामपंचायती, आरोग्य यंत्रणा, रास्त भाव धान्य दुकाने, शाळा आणि महाविद्यालये, पोलीस, परिवहन, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत आदींसाठी मार्गदर्शक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्या प्रमाणे चर्चासत्रे आयोजित करणे, शासकीय कार्यालये, नागरिकांना ध्वजांचे वितरण करणे, लोक प्रतिनिधींना सहभागी करुन घेणे, प्रसिद्धी पत्रके, बॅनर्स, डिजिटल बोर्ड व गीतांच्या माध्यमातून तिरंगाची माहिती देणे, ग्रामपंचायत, आरोग्य केंद्रे, शासकीय कार्यालये, रास्त भाव धान्य दुकाने, महानगरपालिका, नगरपालिका यांनाही ध्वज वितरण केंद्रे म्हणून काम करण्यास सूचित करण्यात आले आहे.

शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यामार्फत जाणीव-जागृती करावी. राष्ट्रध्वजाला समर्पित विशेष संमेलने, शिबिरे, चर्चासत्र इत्यादींचे आयोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक पोलीस स्टेशन परिसरात फलक, प्रसिध्दीपत्रके, उभे फलक (स्टॅंडी) लावणे व ध्वजारोहण करावे. पोलीस वसाहतींमध्ये राष्ट्रध्वजाची विक्री व वितरण केंद्रे निर्माण करण्याची विशेष मोहीम घ्यावी. सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वसाहतीमध्ये, घरी ध्वजारोहण करावे. प्रत्येक पोलीस तपासणी नाक्यावर तिरंगा ध्वजाची प्रसिध्दीपत्रके लावण्यात येणार आहेत.

झेंडा तयार करताना घ्यावयाची काळजी

  • तिरंगा झेंड्याचा आकार आयताकार असावा.
  • तिरंगा झेंड्याची लांबी : रुंदीचे प्रमाण हे 3 : 2 असे असावे.
  • तिरंगा खादी अथवा कॉटन, पॉलिस्टर, सिल्क कापडापासून बनविला जाऊ शकतो.
  • झेंड्यामध्ये सर्वात वर केशरी, मध्यभागी पांढरा व खाली हिरवा रंग असावा. मध्यभागी पांढऱ्या पट्टीवर 24 रेषांचे गोलाकार निळ्या रंगाचे अशोकचक्र असावे.
  • प्लास्टिक किंवा कागदी झेंडा वापरु नये,
  • कोणतेही सजावटी वस्तु लावू नयेत तसेच राष्ट्रध्वज फडकविते वेळी फुलांच्या पाकळ्या ठेवण्यात येऊ नये.
  • राष्ट्रध्वज फाटलेला, मळलेला व चुरगळलेला लावण्यात येऊ नये
  • एकाच वेळी इतर ध्वजासोबत एकाच काठीवर फडकवू नये.
  • राष्ट्रध्वजापेक्षा इतर कोणताही ध्वज उंच लावू नये.
  • तोरण, गुच्छे अथवा पताका म्हणून अन्य कोणत्याही प्रकारचे शोभेसाठी उपयोग करु नये.

झेंडा फडकविण्याचे नियम

  • प्रत्येक नागरिकाने तिरंगा झेंडा संहितेचे पालन करावे.
  • तिरंगा झेंडा फडकविताना केशरी रंग वरच्या बाजूने असावा.
  • अर्धा झुकलेला, फाटलेला, कापलेला झेंडा कुठल्याही परिस्थितीत लावला जाऊ नये.
  • तिरंगा झेंडा उतरविताना काळजीपूर्वक सन्मानाने उतरवावा.
  • दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर झेंडा’ उपक्रमांतर्गत लावण्यात येणारे झेंडे उपक्रम संपल्यानंतर प्रत्येकाने सन्मानाने व सुरक्षित ठेवावे.
  • उपक्रम संपल्यानंतर झेंडा फेकला जावू नये, तो सन्मानाने जतन करुन ठेवावा.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना राबविण्यात येणाऱ्या ‘घरो घरी तिरंगा’ या अभियानातून देशातील प्रत्येक घराघरात देशभक्तीची चेतना निर्माण होईल. स्वातंत्र्य संग्रामाचे स्मरण करुन या अनोख्या अभियानात सर्वांनी एक दिलाने सहभागी होऊया आणि अभिमानाने, स्वयंस्फूर्तीने आपल्या घरावर राष्ट्रध्वज उभारु या.


Back to top button
Don`t copy text!