राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून काम करताना खेळ आणि खेळाडूंना वैभव प्राप्त करून देऊ – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १७ जुलै २०२३ । बारामती ।  राज्याचा क्रीडामंत्री म्हणून काम करताना सर्व प्रकारच्या खेळांना आणि खेळाडूंना शासन स्तरावरून मदतीसह प्रोत्साहन देण्याची भूमिका असेल त्यातून खेळ आणि खेळाडू यांना वैभव प्राप्त करून देण्यासाठी काम करत राहू असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केले.

कबड्डी महर्षी शंकरराव तथा बुवा साळवी यांची जयंती राज्यात कबड्डी दिन म्हणून महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनकडून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने जिल्हा क्रीडा संकूलात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी बुवा साळवी यांना अभिवादन करून क्रीडा मंत्री बोलत होते.

यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी जगन्नाथ लकडे,  कबड्डी खेळातील जीवनगौरव प्राप्त गणपतराव माने, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू  दयानंद सारोळे,राष्ट्रीय कबड्डीपंच लक्ष्मण बेल्हाळे, छत्रपती पुरस्कार विजेते रणजित चामले, उदगीरचे तालुका क्रीडा अधिकारी चंद्रकांत लोदगेकर, रेणापूरचे तालुका क्रीडा अधिकारी सुरेंद्र कराड, मकरंद सावे, व्यंकट बेंद्रे, जिल्ह्यातील 113 क्रीडा शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या.

लातूर जिल्ह्याला यापूर्वी दिलीपराव देशमुख यांच्या रूपाने पहिला तर दुसऱ्यांदा क्रीडा मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली आहे. यासंधीचे आपण सोने करू, क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्यांनी वेळोवेळी नावीन्यपूर्ण सूचना कराव्यात त्यांच्या योग्य त्या सूचनाची अंमलबजावणी केली जाईल. त्यामुळे खेळ आणि खेळाडू यांच्या कामगिरीत सुधारणा होईल. खेळाला वैभव प्राप्त करून देण्यासाठी देशातील उत्तमोत्तम क्रीडासंकुलाची पाहणी करून राज्यातही सर्वसोयीनीयुक्त क्रीडा संकुलं उभी करणे, सध्या अस्तित्वात असलेल्या क्रीडा संकुलात खेळाडुसाठी सुविधा निर्माण करून देणे. लातूर आणि उदगीर येथे बालेवाडी सारखे सुसज्ज स्टेडियम उभं करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

आपल्यालाही खेळाची आवड आहे, लहानपणी ज्या जिल्हा क्रीडा संकुलात खेळलो आहे,त्याच क्रीडा संकुलात राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून घोषणा झाल्यानंतर पहिलाच कार्यक्रम करतो आहे. हा योगायोगाने आलेला योग आनंददायी आहे.


Back to top button
Don`t copy text!