
स्थैर्य, 12 जानेवारी, सातारा : आम्ही समरसतेतून समता आणू आणि भारत मातेला मातृ स्थानी मानणारा समाज निर्माण करू असे उद्गाार समरसता गतिविधिचे केंद्रीय मंडळ सदस्य डॉ. रमेश पांडव यांनी काढले.
सातारा येथे बंधुता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून ते उपस्थितांशी संवाद साधत होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी सातारचे नूतन नगराध्यक्ष अमोल मोहिते होते.
2 जानेवारी 1940 रोजी कराड येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भवानी शाखेला दिलेली भेट ही केवळ ऐतिहासिक घटना नव्हे, तर भारतीय समाज जीवनाला दिशा देणारा वैचारिक क्षण होता. याच ऐतिहासिक स्मृतीचे औचित्य साधून, या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह महेश शिवदे, नुतन नगरसेविका सौ विमल गोसावी, सौ अर्चना कांबळे, नुतन नगरसेवक राजू गोरे, अक्षय जाधव, विश्वतेज बालुगडे, उद्योजक बाळासाहेब खरात, दत्ताजीराव थोरात, माजी सरपंच आप्पा माने, माजी उपसरपंच कांतीलाल कांबळे, कामेश कांबळे, अमित भिसे, राजू जेधे, बाळासाहेब गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.
रमेश पांडव म्हणाले, बंधुता परिषद ही केवळ कार्यक्रम नसून, समाज प्रबोधनाची चळवळ आहे. परस्पर संवाद, समरसता, सामाजिक सौहार्द आणि राष्ट्रनिष्ठा या मूल्यांची पुनर्स्थापना करण्याचे कार्य ही परिषद करते. विविध विचारधारांचे लोक एका व्यासपीठावर येऊन समाज हिताचा विचार करतात हेच या परिषदेचे खरे महत्त्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खरंच शाखेला भेट दिली का नाही, याचा पुरावा शोधण्याची गरज नाही. अनेक ग्रंथात त्यांनी हिंदू संघटनेचे महत्त्व समजावून सांगितले आहे. याच्या समर्थनार्थ अनेक पुस्तकांची नावे पृष्टासह श्री पांडव यांनी सांगीतली. आजच्या काळात, जिथे समाजात ताणतणाव व विभाजनाची बीजे दिसतात, तिथे बंधुता परिषद एकत्र येण्याचा, एकमेकांना समजून घेण्याचा आणि पुढे जाण्याचा मार्ग दाखवते. सध्याच्या काळात नोकर्यांची संख्या मर्यादित असताना स्वरोजगार हेच त्यावरचे उत्तर ठरेल. समरसता मंचाने स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
पश्चिम महाराष्ट्र चर्मकार समाजाचे अध्यक्ष सतीश रावखंडे यांनी या उपक्रमाचे स्वागत केले आणि भावी काळात या उपक्रमास सर्व सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.
दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उमेश खंडूजोडे म्हणाले, समरसता मंचाची सर्व मंडळी आपली मित्र असल्याचे सांगितले. हळूहळू संघाबद्दलचे गैरसमज दूर होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
नगरसेवक अॅड. दत्तात्रेय बनकर यांनी असे कार्यक्रम शासकीय पातळीवर होण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल विनाकारण गैरसमज पसरवले गेले हे खेदजनक असून, आता मात्र सहमतीचे नवे युग सुरू झाले आहे याचा त्यांनी आनंद व्यक्त केला.
नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी या परिषदेस शुभेच्छा व्यक्त करताना, गैरसमज दूर होण्यास प्रारंभ झाला आहे असे सांगितले.
पश्चिम महाराष्ट्र समरसता गती विधीचे सहसंयोजक मुकुंदराव आफळे यांनी प्रास्ताविक केले. समरसता गतिविधिचे जिल्हा संयोजक श्री जयंत देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. बंधुता परिषदचे सहसंयोजक अॅड. प्रणित ससाणे यांनी आभार प्रदर्शन केले. शेवटी सामूहिक पसायदानाने या परिषदेची सांगता झाली.

