
सातारा – 99 व्या संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन करताना डॉ.आशुतोष जावडेकर, मंत्री भरतशेठ गोगावले, खा.श्री.छ. उदयनराजे भोसले, मंत्री श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, विनोद कुलकर्णी, किशोर बेडकिहाळ, डॉ.राजेंद्र माने, नंदकुमार सावंत आणि मान्यवर.
स्थैर्य, सातारा, दि.20 ऑक्टोबर : साहित्य संमेलन ही मूठभर लोकांसाठी ही परंपरा असताना ते जनसामान्यांसाठी व्हावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. सातार्याचे 99 वे संमेलन हे जनसंपर्क वाढवणारे संमेलन ठरेल. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने निश्चितच त्याचा फायदा आपण सर्वांनी घ्यायचा आहे. मराठी मातृभाषा म्हणून आवश्यक आहे परंतु जगामध्ये संपर्क वाढावयाचा असेल तर इंग्रजी आवश्यक आहे, त्यामुळे इंग्रजी भाषेला आपण मावशी करुया आणि त्याच्या मदतीने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा ब्रॅण्ड हा जगभरात पोहचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया, असे आवाहन लेखक, कवी, गीतकार, संगीतकार डॉ. आशुतोष जावडेकर यांनी केले.
येथील जनता सहकारी बँकेच्या तळमजल्यावर 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी संमेलनाचे स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, विशेष उपस्थिती खा. श्री.छ. उदयनराजे भोसले तर प्रमुख पाहुणे म्हणून रोजगार हमी, फलोत्पादन आणि खार जमीन विकासमंत्री भरतशेठ गोगावले यांची उपस्थिती होती. यावेळी संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत, जनता सहकारी बँकेचे चेअरमन अमोल मोहिते, व्हाईस चेअरमन विजय बडेकर आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
डॉ. आशुतोष. जावडेकर पुढे म्हणाले, साहित्य संमेलन म्हटले की ते होण्यापूर्वी साहित्यिक फटाके फुटण्यास सुरुवात होते. श्री. कुलकर्णी यांनी कार्यालयाच्या उद्घाटनाचा मान तरुणाईचे प्रतिनिधीत्व करणार्याला देऊन चांगला पायंडा पाडला आहे. संमेलन पुढे न्यायचे असेल तर तरुण पिढी त्यात येणे आवश्यक आहे आणि त्यासाठी अगोदर तरुण लेखक यायला पाहिजेत. हा सन्मान मला दिल्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो. 99 व्या संमेलन हे ऐतिहासिक होणार असून यानिमित्ताने सातारा-पुणे ऐतिहासिक संबंधांची पुनरावृत्ती होईल. कोणत्या स्तरातील असला तरी त्याला समस्या असतात परंतु या समस्यांमध्ये धीर देण्याचे काम साहित्य करते आणि ते संमेलनातील होते. त्यामुळे संमेलन हे जनसामान्यांसाठी असावे हा त्याचा मूळ उद्देश हरवला होता परतुं सातार्याचे हे संमेलन त्याला अपवाद ठरुन हे संमेलन सगळ्याचं होईल आणि ते जनसंपर्क वाढवणारे ठरेल. संमेलनाचे कार्यालयच इतके देखणं झाले आहे त्यावरुनच संमेलन कशा पध्दतीने होईल याचा सर्वांना अंदाज आला असेल. या संमेलन यशस्वी करण्यासाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, विनोद कुलकर्णी यांच्यासारखे कुशल संघटक असल्याने संमेलन वैशिष्ट्यपूर्ण, नाविन्यपूर्ण होईल यात शंका नाही. परंतु संमेलनाचा हा ब्रॅण्ड आपल्याला सर्वांना जगभरात पोहचवायचा आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करुया.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन लेखक डॉ. आशुतोष जावडेकर, मंत्री भरत गोगावले, खा.श्री.छ. उदयनराजे भोसले, मंत्री श्री.छ. शिवेंद्रसिंहाराजे भोसले, विनोद कुलकर्णी, नंदकुमार सावंत, अमोल मोहिते, विजय बडेकर, विक्रम पाटील आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी 99 व्या अखिल भारतीय संमेलनाला शुभेच्छा देत सर्व प्रकारची मदत देण्याची ग्वाही दिली. यावेळी बोलताना मंत्री भरतशेठ गोगावले यांनी साहित्य संमेलन ही मेजवानी असते. या संमेलनाला मंत्रीमंडळाचे संपूर्ण सहकार्य तर राहीलच परंतु जे लागेल ते सहकार्य करु. हे संमेलन निश्चितपणे चांगले, यशस्वी करण्यासाठी आणि लक्षात राहील असे करण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन दिले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष मंत्री श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले संमेलनाची जबाबदारी मोठी आहे. हे संमेलन आपल्याला वेगळे करुन दाखवायचे असून सातारच्या संमेलनापासून एका नवा अध्याय पुढे सुरु होईल याची खात्री देता. हे संमेलन सातारकरांचे, जिल्हावासियांचे असून सर्वांनी यामध्ये योगदान द्यावे. आर्थिक बाबीबरोबरच इतर गोष्टींना पण साथ द्यावी, युवा पिढीने संकल्पना मांडाव्यात. पुढील 100 वर्षे सातारच्या संमेलनाचे नाव काढले जाईल या पध्दतीने नीटनेटके, वेगळेपण दाखवणारे हे संमेलन करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जनता बँकेची जागा साहित्य संमेलनाच्या कार्यालयासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल जनता बँकेचे चेअरमन अमोल मोहिते यांचा सत्कार मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच कार्यालयाचे इंटिरियर डेकोरेशन करणार्या स्नेहल कुलकर्णी यांचाही सत्कार मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविकात संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी सातारचे संमेलन दर्जेदार, साहित्य मूल्य असलेले असे उत्कृष्ट संमेलन व्हावे यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. संमेलनात विविध मान्यवर येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी किशोर बेडकिहाळ, शिरीष चिटणीस, सुनील काटकर, जयवंतदादा भोसले, सुजाता राजेमहाडिक, माधव सारडा, अक्षय गवळी, बाळासाहेब गोसावी, अविनाश बाचल, रवींद्र माने, वजीर नदाफ, चंद्रशेखर घोडके, अॅड. चंद्रकांत बेबले, अनिल जठार, मच्छिंद्र जगदाळे, डॉ. राजेंद्र माने, किरण साबळे, संपत जाधव, क्षमा जोशी, डॉ. संदीप श्रोत्री, अजित साळुंखे, सचिन सावंत, आर. डी. पाटील, महेश सोनावणे, वि. ना. लांडगे, पद्माकर पाठकजी, संजय माने, तुषार महामूलकर, विविध क्षेत्रातील मान्यवर, सातारकर उपस्थित होते. यावेळी वैदेही कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. नंदकुमार सावंत यांनी आभार मानले.