स्थैर्य, फलटण, दि. २८: ठेविले अनंते तैसेचि रहावे । चित्ती असो द्यावे समाधान ॥ थोर संत तुकाराम महाराजांनी मानवजातीला उद्देशून लिहिलेला हा अभंग. या अभंगामधून चिंतामुक्त जीवन जगण्याचा सुरेख संदेश संत तुकोबारायांनी सर्वांना दिला आहे. त्यामुळे या ओवीचा व्यापक अर्थ लक्षात घेवून त्यानुसार जगणे आजच्या काळात क्रमप्राप्त बनले आहे.
महाराष्ट्र ही संतांची, क्रांतीकारकांची भूमी. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत गाडगे महाराज, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, श्री गजानन महाराज असे अनेक संतपुरुष या भूमीत अवतरले. जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत या सगळ्या विभूंतीचे नाव अजरामर ठेवणार असेच त्यांचे कार्य आहे. ही सर्व मंडळी आपले आयुष्य एका विशिष्ठ ध्येयाने जगली. भौतिक सुखाचा त्याग करुन सुनिश्चित ध्येय गाठण्यातच त्यांनी समाधान मानले. ‘पैसा – संपत्तीच्या मागे धावा, यातच खरे सुख आहे, सत्ता, प्रतिष्ठा याशिवाय जगण्यात अर्थ नाही’ असे त्यांनी कधी केलेही नाही आणि सांगितलेही नाही. याउलट, आपल्याला हवी असलेली वस्तू न मिळाल्यास आपल्याला दु:ख होते. त्यामुळे कुठल्याही भौतिक सुखाची हाव ठेवू नका. अमकी गोष्ट सुखदायक आहे ही जी कल्पना आहे, तीच दु:खाचे मूळ आहे, हे समजून आपण वागले पाहिजे. अमूक एक गोष्ट दुसर्याकडे आहे, ती माझ्याकडे का नाही? असा विचार करु नका. दुसर्याचे अवगुण पाहण्याची वृत्ती टाकून द्या. जन्माला आल्यावर वाट्याला आलेले भोग भोगतेवेळी मनुष्याने ते समाधान चित्ताने भोगावे, कारण मनुष्याने त्यातून कितीही सुटण्याचा प्रयत्न केला तरीही मनुष्याची प्रारब्ध भोगून झाल्याशिवाय त्यातून सुटका होत नाही. त्यामुळे परमेश्वराने ज्या स्थितीत आपल्याला ठेवले आहे त्यात समाधान मानावे आणि निरपेक्ष वृत्तीने आपली कर्मे पार पाडावीत. अशीच शिकवण या सर्व संतांनी आपल्या सर्वांना दिली आहे.
मात्र संत शिकवणीच्या उलट सर्व काही चालले आहे. आज 21 व्या शतकात सर्वचजण सुखाच्या मागे धावत आहेत. पैसा + जमीन जुमला + श्रीमंती = सुख असे जीवनाचे समीकरण बनले आहे. भौतिक सुखाच्या मागे धावताना श्रीमंती म्हणजे यश, सत्ता म्हणजे सर्वस्व, मानमरातब म्हणजे विजय आणि या सर्वांच्या प्राप्तीसाठी पैसा हेच एकमेव ध्येय अशी जीवनाची वाटचाल आखली जात आहे. त्यामुळे हे करत असताना माणूस खर्या अर्थाने सुख, समाधानापासून खूप दूरच जात आहे.
आज घरोघरी मुलांना झटपट श्रीमंत कसे होता येईल याची चिंता तर पालकांना आपण मुले शिकवली पण ती यशस्वी कधी होणार याची काळजी. सार्वजनिक जीवनात काम करणार्यांना दुसर्यापेक्षा माझी प्रतिष्ठा कशी वाढेल?, नोकरी करणार्यांना त्याच्याआधी मला बढती कशी मिळेल?, व्यायसायिकाला त्याच्यापेक्षा माझा धंदा कसा वाढेल?, राजकारण्यांना आपले सत्ताकेंद्र कसे विस्तारेल? अशा विवंचनेने ग्रासून टाकले आहे. या अपेक्षांच्या ओझ्याखाली समाधानाची खरी व्याख्याच सगळे जण विसरुन जात आहेत. यातूनच जेव्हा तुलनेने आपल्याला हव्या असलेल्या प्रतिमेत आपण दिसत नाही तेव्हा आपल्याकडे काहीतरी कमी आहे, आपण अपुरे आहोत अशी भावना दृढ होते. यातूनच संघर्ष, मतभेद, नैराश्य, यशस्वी न होण्याची भिती, स्वत:ला पुरेसे मोल नसल्याची खंत निर्माण झाल्याशिवाय राहत नाही आणि इथूनच दु:ख आपल्या जीवनाला ग्रासून टाकते.
एका सद्गृहस्थांनी आपल्या मुलांना मोठ्या कष्टातून उच्चशिक्षीत केले. परंतू मुलांना अजून म्हणावे तसे नोकरीत यश येत नसल्यामुळे ते चिंताग्रस्त झाले. मुलांनी उच्च शिक्षण पूर्ण करुन स्पर्धा परीक्षेतून यश मिळवावे अशी त्यांची इच्छा होती. पण ती पूर्ण झाली नाही आणि मुले सध्या खाजगी क्षेत्रात नोकरी करत असताना अजूनही स्थिरस्थावर नाहीत हे त्यांच्या चिंतेचे मुळ कारण बनून ते व्यथित झाले. शिक्षणासाठी, नोकरीसाठी घरापासून दूर राहिलेली अनेक मुले आपण आज पाहतो. यापैकी बर्याच जणांमध्ये वाईट संगत, व्यसनाधिनता, चंगळवाद, अनावश्यक गोष्टींची प्रलोभने असे चित्र सर्रास दिसते. पण वास्तविक पाहता इथे परिस्थिती उलट होती. घरापासून दूर राहूनही त्यांची मुले कष्टाळू, धडपडी, हुशार, काटकसरी आणि प्रयत्नवादी असल्याने ती व्यवस्थित शिकली. पण याचे समाधान ते गृहस्थ पूर्णपणे विसरले आणि नको त्या चिंतेत पडले. खरं तर त्यांनी मुलांना शिकवण्याची जबाबदारी चोख पार पाडलेली असताना आणि मुलेही गुणवान असताना भविष्याची चिंता न करता पुढे होणार्या गोष्टी प्रारब्धावर सोडण्यातच त्यांचे हित आणि हे लक्षात येण्यासाठी त्यांच्यामध्ये ‘ईश्वर’ कर्ता आहे ही भावना दृढ होणे आवश्यक. यातूनच सुख – समाधानाची प्राप्ती करता येवू शकते. हेच संत आपल्याला शिकवतात.
संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितल्याप्रमाणे, दंभरहितता, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, सद्गुरुसेवा, आंतर्बाह्य शुद्धी, हे गुण अंगिकारुन कष्ट मनापासून करावेत. आपल्या कर्तव्यात कोणत्याही फळाची इच्छा न धरता प्रामाणिक राहावे. आपली पूज्यता, आपण डोळ्यांनी पाहू नये. आपली कीर्ती आपण कानांनी ऐकू नये. समर्थ रामदास स्वामी आपल्या ‘मनाचे श्लोक’ मध्ये सांगतात, ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तू चि शोधून पाहे’. याप्रमाणे जर जगात सर्वात सुखी कोण आहे? याचा शोध घ्यायचा आपण प्रयत्न केला तर कुणीही सर्वार्थाने सुखी आहे असे म्हणता येणार नाही. त्यामुळे समाधानातच खरे सुख आहे हे लक्षात ठेवावे. तुम्ही समाधानी असाल तरच सुखी राहाल ही खूणगाठ पक्की करावी. सुख आणि दु:ख हे मानण्यावर आहे. त्यामुळे मनालाच सुखी होणं शिकवलं पाहिजे. हे करणे कठीण असले तरी अशक्यप्राय नाही हे ही निश्चित. प्रयत्न करणे आपल्या हाती, बाकी ‘प्रभू श्रीरामा’ची इच्छा म्हणून, ‘चित्ती असू द्यावे समाधान’ !
– रोहित वाकडे,
संपादक, साप्ताहिक लोकजागर