दैनिक स्थैर्य । दि. १३ ऑगस्ट २०२२ । पुणे । आजपासून १५ ऑगस्ट पर्यंत देशभरात घरोघरी तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष स्मरणीय ठरावे असा हा उपक्रम आहे. यानिमित्ताने संपूर्ण देश एक होणार आहे, सर्वांचा यात सहभाग असणार आहे. एकत्वाची ही भावना येणाऱ्या काळासाठी प्रेरक ठरणारी असेल.
भारताला गतवैभवाचा आणि स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली इतिहास आहे. स्वातंत्र्यातील आनंद अनुभवतांना पारतंत्र्याची बंधने झुगारून देत ज्यांनी स्वातंत्र्यलढ्याला बळ दिले आणि त्यासाठी घरदारावर तुळशीपत्र ठेवले अशा असंख्य अनामविरांप्रती देशवासियांच्या मनात अभिमानाची भावना आहे. त्यांचा त्याग हा आपल्या प्रगतीचा जसा आधार आहे, तशी ती देशाला यशाच्या मार्गावर पुढे नेणारी प्रेरणा आहे. ‘घरोघरी तिरंगा’ या उपक्रमाच्या माध्यमातून ही प्रेरणा घराघरातील तरुणाईपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.
आज देश विज्ञान, तंत्रज्ञान, कला, क्रीडा, शिक्षण, पायाभूत सुविधा आदी विविध क्षेत्रात पुढे जात आहे. देशाने गेल्या ७५ वर्षात केलेली नेत्रदिपक प्रगती आपल्यासमोर आहे. या वाटेवरून आणखी उत्तुंग यशाकडे जाताना मागेवळून स्वातंत्र्य सेनांनींच्या प्रति सन्मानाची भावना मनात राहणे हे देशगौरवासाठी तेवढेच महत्वाचे आहे. या निमित्ताने शाळा-महाविद्यालयतून, विविध सामाजिक उपक्रमातून त्यांचे कार्य नव्या पिढीपर्यंत जाणे अपेक्षित आहेत आणि त्यादृष्टीने उपक्रमही आयोजित करण्यात येत आहेत.
तिरंगा ध्वजामागे राष्ट्रप्रेमाची, गौरवाची, अभिमानाची भावना आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्यांचा सन्मान होताना जेव्हा आपला राष्ट्रध्वज उंचावत असताना राष्ट्रगीत सुरू व्हायचे तेव्हा देशवासियांचा ऊर अभिमानने भरून यायचा. सीमेवर लढणारा जवानही तिरंग्यासाठी प्राण देण्यास तयार असतो. अंतराळात जाणाऱ्या यानावर असलेला तिरंगा आपल्या मनात आनंदतरंग निर्माण करतो. अशा या आपल्या तिरंगा ध्वजाप्रति आपली भावना व्यक्त करताना त्याचा सन्मान राखला जाईल याची दक्षतादेखील घ्यावी लागणार आहे.
स्वराज्य महोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यातील २१ लाख घरांवर तिरंगा फडविण्याचे नियोजन आहे. यानिमित्ताने विविध रॅली, सोहळे, स्थळभेटींचे आयोजन करण्यात येत आहेत. सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. हा देशगौरवाचा उत्सव साजरा करण्यासाठी आपणही यात सहभाग घ्यायचा आहे. आपल्या परिसरातील, जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन तिथला इतिहास जाणून घेता येईल. एखाद्या अनामविराची गौरवगाथा शोधून त्याचे वाचन करता येईल. शाळकरी विद्यार्थी स्वातंत्र्य सैनिकांच्या चित्रांचा संग्रह करू शकतील, महाविद्यालयाचे विद्यार्थी स्वातंत्र्य लढ्यातील इतिहासावर आधारीत शोध निबंध लिहू शकतील, शालेय विद्यार्थ्यांची लष्कराच्या सैनिकांशी भेट घडवून आणता येईल किंवा भारतीय सैन्यातील अधिकाऱ्यांशी त्यांचा संवाद घडवून आणता येईल. आपल्या अशा लहान भूमिकेमुळे हा उत्सव खऱ्या अर्थाने स्मरणीय होईल.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशाच्या पुढील यशाची आणि गौरवाची पायाभरणी करणारा ठरावा अशी अपेक्षा आहे. त्यासाठी देशप्रेमाची ही ज्योत मनात सतत तेवत ठेवावी लागेल. त्यासाठी आपण ज्या क्षेत्रात असू त्या क्षेत्रात आपली भूमिका अधिक प्रभाविपणे, क्षमतेने आणि देशाचा सन्मान वाढविण्याच्या हेतूने अदा करावी लागेल. आपली प्रत्येक सकारात्मक कृती देशाच्या राष्ट्रध्वजाचा गौरव अधिक वाढवणारी ठरणार आहे. तेव्हा स्वातंत्र्य लढ्यातील योद्ध्यांकडून प्रेरणा घेत आणि उत्तम कार्याचा निश्चय करीत उत्साहाने आपल्या घरावर तिरंगा फडकावूया!
-जिल्हा माहिती कार्यालय, पुणे