महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका सर्वदूर फडकू दे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


दैनिक स्थैर्य । दि. ०४ नोव्हेंबर २०२२ । मुंबई । ‘देशाचा मानबिंदू असणाऱ्या आपल्या महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका अशीच सर्वदूर फडकू दे. अन्नदाता शेतकरी राजा, कष्टकरी, मेहनती उद्यमी बांधवांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट नांदो, असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलचरणी घातले आहे. कार्तिकी एकादशी निमित्ताने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी चरणी ही प्रार्थना अर्पण केली आहे. तसेच राज्यातील जनतेला कार्तिकी एकादशीच्या पूर्वसंध्येला शुभेच्छाही दिल्या आहेत.

मुख्यमंत्री या संदेशात म्हणतात, स्वातंत्र्य चळवळ ते आधुनिक भारताच्या उभारणीत महाराष्ट्राने आपल्या कामगिरीने प्रगतीची पताका सदैव फडकत ठेवली आहे. या सगळ्याचे श्रेय आपला अन्नदाता शेतकरी राजा, कष्टकरी, कामगार आणि उद्यमशीलता जोपासणाऱ्या मेहनती अशा सर्वांनाच जाते. या सर्वांच्या आयुष्यात सदैव सुख, समृद्धी आणि भरभराट नांदो आणि राज्यावर येणाऱ्या आव्हानांचा मुकाबला करण्याचे बळ मिळावे हीच विठ्ठल-रुक्मिणी चरणी प्रार्थना.

कार्तिक एकादशीपासून विठ्ठल-रुक्मिणीचा चैतन्यदायी असा भक्ती सोहळा सुरु होतो. या मंगल पर्वाच्या प्रारंभानिमित्त राज्यातील सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा आणि महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका अशीच सर्वदूर फडकू दे, हेच विठूमाऊलीला भक्तिपूर्ण साकडे !


Back to top button
Don`t copy text!