स्थैर्य, नवी दिल्ली, दि. २८ : महाराष्ट्रातील आगामी सर्व निवडणुका स्वबळावर जिंकू, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला. सोमवारी (27 जुलै) ते भाजपच्या महाराष्ट्रातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या पहिल्या बैठकीत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते.
भाजपची राज्यातील ताकद आणखी वाढविण्यासाठी अथक परिश्रम करण्याचे आवाहन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना करीत नड्डा यांनी पुढील प्रत्येक निवडणुकीत पक्ष स्वबळावर विजय संपादन करेल, असा विश्वास व्यक्त केला.
कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीकाही नड्डा यांनी केली.
”महाविकास आघाडी सरकार स्वार्थासाठी स्थापन झाले असून, आपली कमाई करणे एवढाच त्यामागे हेतू आहे. कोरोनासारख्या संकटकाळातही भ्रष्टाचार होत असल्याचे प्रकार राज्यातील पक्षाच्या नेत्यांकडून समजले आहेत. हा भ्रष्टाचार उघड करून सरकारविरोधातील लढा तीव्र करा,” असं आवाहनही नड्डांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना केलं.
दरम्यान, भाजपने महाराष्ट्रात खरंच स्वबळावर लढून पाहावं, असं आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलं आहे. “भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला, तर त्यांचे कमी आमदार निवडून येतील,” असा टोलादेखील बाळासाहेब थोरात यांनी लगावला.