दैनिक स्थैर्य । दि.१३ फेब्रुवारी २०२१ । फलटण । महिला व मुलींना प्रतिकूल परिस्थितीत स्वतःचे संरक्षण करता यावे. यासाठी त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सातारा जिल्हा पोलिस प्रशासन व जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सुरक्षा पथदर्शी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
यामाध्यमातून शालेय मुलींना स्व – संरक्षणाचे धडे देण्यासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन फलटण विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे व पोलिस निरीक्षक भारत किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोग्रेसिव्ह काॅन्व्हेंट स्कूल अॅण्ड ज्युनिअर काॅलेज, कोळकी येथे करण्यात आले आहे. यावेळी सर्व प्रथम पोलिस निर्भया पथक फलटणच्या महिला प्रमुख मा.सौ. वैभवी भोसले, पोलिस प्रशिक्षक सुरज परिहार, प्रिया शेडगे व कु. अपूर्वा करपे यांचे संस्थेच्या वतीने गुलाब पुष्प व रोप देऊन स्वागत करण्यात आले.
निर्भया पथकच्या प्रमुख सौ.भोसले यांनी मुलींना आत्मनिर्भर होण्यासाठी स्व-संरक्षणाचे धडे आत्मसात करणे काळाची गरज असल्याचे नमूद करून तेरा दिवस प्रोग्रेसिव्हच्या प्रांगणात होणा-या प्रशिक्षण शिबिराचे स्वरूप सांगितले. शिबिरा दरम्यान शिकवल्या जाणा-या स्वसंरक्षण तंत्रांचा प्रत्यक्ष उपयोग मुलींनी एकटे रस्त्यावरून जाताना छेडछाड झाल्यावर व अतिप्रसंग ओढावल्यास निर्धाराने कसा करावा हे विद्यार्थ्यीनींना सांगितले.
तसेच या पथदर्शी उपक्रमासाठी प्रोग्रेसिव्हची निवड केल्याबद्दल संस्थेचे सचिव विशाल पवार यांनी जिल्हा पोलिस प्रशासनाचे आभार मानून विद्यार्थ्यीनी, प्रशिक्षक व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. संध्या गायकवाड, सौ.प्रियांका पवार, प्राचार्या सौ.सुमन मकवाना, समन्वयिका सौ.अहिल्या कवितके व पर्यवेक्षक अमित सस्ते यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थ्यीनी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी केले.