स्थैर्य, फलटण, दि. १७: सततच्या लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद राहिल्याने फलटण शहरातील व्यापारी वर्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून ‘कोरोमुळे कमी; आम्ही लॉकडाऊनमुळेच मरु’ अशी अवस्था व्यापारी वर्गाची झाली आहे. वारंवार अर्ज, बैठका, विनवण्या करुनही व्यापार्यांसाठी प्रशासन कुठलाच दिलासा देण्याच्या तयारीत नसल्याने प्रशासनाला दयेचा पाझर फुटणार तरी कधी? असा सवाल व्यापारी विचारत आहेत.
काय आहेत व्यापार्यांच्या भावना?
कोरोना संसर्ग वाढू लागल्याने गेल्या दोन – तीन महिन्यांपासून लॉकडाऊनची कार्यवाही सुरु झाली. प्रत्येक वेळेस 8 ते 15 दिवसांसाठी नियमावली जाहिर होत गेली. प्रशासनाने निर्धारित केलेले दिवस संपले की आशाळभूतपणे पुढच्या घोषणेत निर्बंधात सूट मिळेल अशी आशा लावून बसलेल्या व्यापारी वर्गाच्या पदरी अजूनही निराशाच पडत आहे. वास्तविक रुग्णसंख्या मंदावल्यानंतर सुरु झालेल्या अनलॉकमध्ये दिवसभरातील थोडा काळ का होईना आपल्याला व्यापार सुरु करण्याची मुभा मिळेल असे वाटत असताना मात्र अजूनही प्रशासनाकडून याबाबत कुठलेच संकेत मिळत नसल्याने व्यापारी वर्गाचा संयम हळूहळू संपत चालला आहे. आम्हाला आमचे व्यापार सुरु करण्याची परवानगी द्या; आम्ही प्रशासनाचे सर्व नियम पाळू अशी विनंती अनेकदा करुनही प्रशासन कुठलाच मार्ग काढायच्या मानसिकतेत नाही याची खंत अनेक व्यापारी बोलून दाखवत आहेत. शिवाय सध्या लागू असणार्या निर्बंधांचे अनेक ठिकाणी सर्रास उल्लंघन होत आहे. भाजी मंडई परिसरात गर्दी होतच असते. संचारबंदीच्या वेळेत नागरिक शहरात फिरतच असतात. यावर प्रशासन कोणतीच कारवाई करताना दिसत नाही. मग कोरोनाला अटकाव घालणार तरी कसा? रुग्णसंख्या कशी कमी येणार? आणि असेच चालू राहिले तर आमचे व्यापार आम्ही कायमस्वरुपी बंदच ठेवायचे आहेत कां? असा सवालही व्यापारी उपस्थित करीत आहेत.
नक्की समस्या काय?
सलग दोन महिन्यांहून अधिक कालावधीपासून दुकाने बंद असल्याने उत्पन्न शून्यावर आल्याने दुकानांचे भाडे, लाईट बील, कामगारांचे वेतन, कर्जाचे हप्ते व घरखर्च कसा भागवायचा? पाल्यांची शैक्षणिक फी, घरातील वडिलधार्यांचा नियमितचा वैद्यकीय खर्च, रोजचा भाजी-पाला आदी गोष्टींच्या पूर्ततेसाठी पैसे कुठून आणायचे? अशा आर्थिक विवंचनेत व्यापारी वर्ग चांगलाच अडकला आहे. तर दुसरीकडे बाजारपेठ सुरु झाल्या की गर्दी वाढणार; आणि गर्दी वाढली की पुन्हा कोरोना संसर्गाचा धोका आहेच त्यामुळे लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही, अशा भूमिकेत प्रशासन आहे. त्यामुळे व्यापार्यांच्या समस्येवर तोडगा निघणार कधी? हा खरा प्रश्न आहे.
दिलासा कसा देता येईल?
वास्तविक पाहता; एव्हाना प्रशासनाकडून बाजारपेठा सुरु करण्याच्यादृष्टीने पाऊले उचलली जाणे गरजेचे होते. व्यापार्यांसाठी कडक नियमावली आखून त्यांना ठराविक वेळेकरिता व्यापार सुरु करण्यास परवानगी द्यायला हवी होती. सर्व व्यापार्यांचे स्वतंत्र लसीकरण केंद्रावर 100% लसीकरण पूर्ण करुन घेणे, व्यापार्यांना कोरोना चाचणीचा अहवाल व लसीकरणाचे प्रमात्रपत्र बंधनकारक करणे, गर्दीला अटकाव घालण्यासाठी यंत्रणा उभारण्याची सक्ती करावी, नियम न पाळणार्या व्यापार्यांची आस्थापना 30 दिवसांसाठी बंद करणे अशा उपाययोजना याकरिता राबवता येऊ शकतात. शिवाय व्यापारी वर्गाची स्वतंत्र दक्षता समिती स्थापन करुन नियमांच्या अंमलबजावणीची जबाबदारी त्यांच्यावरही देता येऊ शकते.