स्थैर्य, फलटण : टाकळवाडे, ता. फलटण येथे बिबट्या आढळून आल्याने वन विभागाने तेथे पिंजरे व कॅमेरे लावून शोध मोहीम सुरु केली असताना परिसरातील मठाचीवाडी, निंबळक, पिंप्रद, मिरढे परिसरात बिबट्या आल्याच्या वार्तेने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे, मात्र वन अधिकाऱ्यांनी टाकळवाडे शिवाय अन्यत्र बिबट्या नसून तरस असल्याचा खुलासा केला आहे.
काल (रविवारी) सकाळी बिबटया सदृश्य प्राण्याच्या पायाचे ठसे मठाचीवाडी नजिक शेरेवस्ती,भोसलेवस्ती भागात आढळून आल्याने तेथील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र ते ठसे बिबटयाचे नसून तरस प्राण्याचे असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे शेरेवस्ती, भोसलेवस्तीसह मठाचीवाडी परिसरातील नागरीकांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन वनविभागाने केले आहे.
गेली पंधरा दिवस टाकळवाडे, निंबळक भागात वावर असलेला बिबटया वनविभागाला हुलकावणी देत आहे. वनविभागाने टाकळवाडे येथील पाटीलवस्ती आणि निंबळक इरिगेशन बंगला २९ फाटा लगतच्या करे वस्ती परिसरात दोन पिंजरे आणि कॅमेरे लावले असून त्याची दिशा बदलून बिबट्याचा माग काढण्यासाठी वन खात्याचे अधिकारी/कर्मचारी प्रयत्नशील आहेत, मात्र अद्याप बिबटया पिंजऱ्यात सापडला नसल्याने संपूर्ण परिसर भीतीच्या छायेखाली आहे.
सद्या शिवारात खरीप हंगामाच्या पूर्वतयारीच्या कामात शेतकरी व्यस्त आहे. अनेक ठिकाणी ऊस लागणीला वेग आला आहे. दररोज भाजीपाल्यांची तोडणी सुरु आहे. त्यामुळे शिवारात शेतकऱ्यांची सतत वर्दळ आहे. बिबटया आणि बिबट्या सदृश्य प्राण्यांच्या वावराने शेतकरयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महिला, लहान मुलांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात येत आहे तर पुरुष मंडळीही एकट्याने बाहेर पडण्यास धजावत नाहीत.
अशा स्थितीत मठाचीवाडी लगतच्या शेरेवस्तीवरील शेतकरी संदीप निकम आज सकाळी आपल्या शेतात गेले असता कालच पाणी दिलेल्या केळीच्या बागेत त्यांना बिबट्या सदृश्य प्राण्याच्या पायाचे ठसे आढळून आले,
तसेच बांधावर पाण्याने भरुन ठेवलेल्या हंडयातील पाणी कमी झाल्याने रात्री सदर प्राणी हंड्यातील पाणी पिऊन गेल्याची खात्री शेतकरी निकम यांनी व्यक्त केली आहे. भोसलेवस्ती येथे ऊसातही असे ठसे दिसून आले आहेत. त्यामुळे मठाचीवाडी भागात बिबटया सदृश्य प्राण्याचा वावर आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने लवकरात लवकर बिबट्यासह त्याच्या दोन पिल्लांना पिंजऱ्यात जेरबंद करावे अशी मागणी पूर्व भागातून होत आहे.
तालुक्यात वन्य प्राण्यांचा वावर वाढतो आहे. अनेक ठिकाणी पाहणी केली असता तरसांचे ठसे आढळून येत आहेत. त्यामुळे मठाचीवाडी येथे तरस प्राण्याचे ठसे असून नागरीकांनी घाबरुन जाऊ नये. काळजी घ्यावी असे आवाहन वन क्षेत्रपाल एम. यु. निकम यांनी केले आहे.