तासवडेतील कंपनीत घुसले बिबटे

हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद


स्थैर्य, 22 मार्च, सातारा : तासवडे (ता. कऱ्हाड) येथील औद्योगिक वसाहतीत पहाटेच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. तासवडे एमआयडीसीमधील डी- १० ब्लॉकमधील पिडीलाइट कंपनीच्या परिसरात भक्षाच्या शोधात तब्बल दोन बिबटे घुसल्याचे उघडकीस आले असून, त्यांच्या हालचाली कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण औद्योगिक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या पाळीवर असलेल्या कामगारांना कंपनीच्या गेटमधून दोन बिबटे आत शिरताना दिसले. अचानक समोर आलेल्या या प्रसंगामुळे कामगारांची अक्षरशः घाबरगुंडी उडाली. काही काळ हे बिबटे कंपनीच्या आवारात मुक्तपणे वावरत होते. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी न होता काहीवेळातच ते निघून गेले.
या घटनेनंतर घाबरलेल्या कामगारांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर पहाटेच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून कामगारांना बिबट्यांपासून बचाव करण्याबाबत मार्गदर्शन केले. दरम्यान, तासवडे, तळबीड आणि वराडे परिसरात बिबट्यांचा वावर सातत्याने वाढत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. औद्योगिक वसाहतीलगतच्या डोंगराळ भागात बिबट्यांचे वास्तव्य असून, अनेकदा ते नागरी व औद्योगिक भागात शिरकाव करत आहेत. यापूर्वीही या परिसरात बिबट्यांचे दर्शन झाले असून, सीसीटीव्हीतही अनेक वेळा बिबट्यांचा वावर दिसून आला आहे. या परिसरातील अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ल्याच्या घटनाही घडल्या आहेत. वनविभागाने वराडे हद्दीत चार वर्षांपूर्वी पिंजरे लावून बिबट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या उपाययोजना तात्पुरत्या ठरल्याचे दिसून येत आहे. वाढत्या बिबट्यांच्या संख्येमुळे नागरिक आणि कामगारांमध्ये भीतीचे वातावरण असून, वनविभागाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
तासवडे औद्योगिक वसाहतीत नोकरीसाठी अनेक कामगार येत असतात. रात्रीच्या पाळीवर असलेल्या कामगारांना कंपनीतच बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. रात्री अपरात्री कामावर येत असताना कामगारांवर बिबट्या हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय रात्री इतर लोकांचा फारसा वावर नसल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!