
बिरदेव नगर भागात घराजवळ बिबट्या दिसल्याच्या चर्चेने खळबळ; ‘स्थैर्य’कडून वृत्ताला दुजोरा नाही, वनविभागाने खात्री करण्याची मागणी.
स्थैर्य, फलटण, दि. २५ डिसेंबर : फलटण शहराच्या अगदी जवळ असलेल्या जाधववाडी (ता. फलटण) गावच्या हद्दीतील बिरदेव नगर परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. एका घराजवळ बिबट्या दिसल्याचा दावा करणाऱ्या पोस्ट आणि मेसेजेस व्हायरल झाल्याने जाधववाडी आणि कोळकी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून (काल आणि आज) कोळकी आणि जाधववाडी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे मेसेज व्हॉट्सॲप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिरत आहेत. विशेषतः जाधववाडी हद्दीतील बिरदेव नगर येथे एका नागरिकाच्या घराजवळ बिबट्या दिसल्याचा दावा या व्हायरल पोस्टमध्ये करण्यात येत आहे. हे ठिकाण फलटण शहरालगत असल्याने नागरिकांमध्ये जास्त घबराट पसरली आहे.
अधिकृत दुजोरा नाही
सदर माहिती केवळ सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टवर आधारित असून, याबाबत अद्याप वनविभागाकडून किंवा कोणत्याही शासकीय यंत्रणेकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. ‘दैनिक स्थैर्य’ देखील या वृत्ताला दुजोरा देत नाही. मात्र, सातत्याने व्हायरल होणाऱ्या या मेसेजेसमुळे परिसरातील रहिवासी, मॉर्निंग वॉकला जाणारे नागरिक आणि शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
वनविभागाने दखल घेण्याची मागणी
शहराच्या इतक्या जवळ बिबट्याचा वावर असण्याची शक्यता आणि सोशल मीडियावरील अफवा यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ या भागात पाहणी करून या वृत्ताची शहानिशा करावी आणि नागरिकांमधील भीती दूर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. नागरिकांनीही घाबरून न जाता सतर्क राहावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सुज्ञ नागरिकांकडून केले जात आहे.

