नागठाणेत भरवस्तीत बिबट्याचा वावर


स्थैर्य, सातारा, दि. १३: नागठाणे (ता.सातारा) येथे महामार्गालगतच भरवस्तीत बिबट्याचा वावर असल्याची घटना उघडकीस आली.बुधवारी पहाटे बिबट्याचा वावर प्राथमिक आरोग्य केंद्र ते महामार्ग सेवारस्ता असा झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले.या घटनेची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना देऊनही याची त्यांच्याकडून कोणतीच हालचाल न झाल्याने ग्रामस्थांमध्ये बिबट्याच्या वावराने भीतीचे तर वनविभागाच्या बेफिकीरीमुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बुधवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास येथील महामार्गालगतच असलेल्या राजेंद्र दिनकर जगताप यांच्या घराच्या पत्र्यावर जोरदार उडी मारून कोणीतरी पळत गेल्याचा आवाज झाला.यावेळी रस्त्यावरील भटकी कुत्रीही जोरजोरात भुंकू लागल्याने जगताप कुटुंबियांना शंका आल्याने त्यांनी घराभोवती लावलेल्या सीसीटीव्ही केमेऱ्याची फुटेज चेक केली.यावेळी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राकडील पटांगणातून बिबट्या त्यांच्या विटेच्या भिंतीचे कंपाउंड पार करून घराच्या पत्र्यावर गेल्याचे निदर्शनास आले.

पत्र्यावरून तसाच पळत हा बिबट्या शेजारील आप्पा निकाळजे यांच्या पत्र्यावर गेला.त्यानंतर काही काळाने पुन्हा या बिबट्याचे दर्शन राजेंद्र जगताप यांच्या हॉटेल दत्ताकृपाच्या पुढील बाजूस महामार्गावर झाले.तेथून हा बिबट्या कुत्र्यांचा ससेमिरा चुकवत याच भागात कोठेतरी नाहीसा झाला.साधारणतः तीन तास या बिबट्याचा या परिसरात वावर सुरू असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमुळे उघड झाले.जगताप कुटुंबीयांनी याची माहिती तात्काळ बोरगाव पोलीस व वनविभागाला दिली.बोरगाव पोलिसांच्या रात्रगस्तीच्या कर्मचाऱ्यांनी येथे पाहणी ही केली. मात्रया घटनेची माहिती अनेकदा वनविभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना देऊनही त्यांनी बुधवारी सायंकाळपर्यंत येथे येऊन साधी पाहणी करण्याचीही तसदी घेतली नाही.भरवस्तीत बिबट्या रात्रभर फिरत असल्याने नागठाणे गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे व वनविभागच्या सुस्त व बेफिकीर धोरणाबद्दल संतापाचे वातावरण निर्माण झालर आहे.


Back to top button
Don`t copy text!