ग्रामस्थांत भीती; वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी
स्थैर्य, नागठाणे, दि. ०६ : भरतगाववाडी (ता. सातारा) येथे बिबट्याचे पुन्हा एकदा दर्शन घडल्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
भरतगाववाडी येथील श्रीकांत मोहिते व प्रकाश पवार हे दोघे हर्णेशा नावाच्या शिवारात दुचाकीवरुन निघाले असता अगदी काही अंतरावरच त्यांना बिबट्याचे दर्शन घडले. दुचाकीच्या आवाजाने बिबट्याने झाडीत धूम ठोकल्याचे संबंधितांनी नमूद केले.
गेल्याच आठवड्यात प्रवीण पवार यांच्या नंबर नावाच्या शिवारात, तसेच दीपक कणसे यांचे बोराटा नावाच्या शिवारात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले होते. याबाबत ग्रामस्थांनी वन विभागास कळविले. त्यानंतर सायंकाळी वन अधिकारी संजय धोंडवड तसेच वनरक्षक साधना राठोड, चालक धनंजय लादे यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन संबधित ठिकाणी पंचनामा केला. पावलांचे ठसे पाहिल्यानंतर संबंधित वन्यप्राणी बिबट्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संजय धोंडवड यांनी ध्वनिक्षेपकाद्वारे ग्रामस्थांना याबाबत कल्पना दिली. गावात ठिकठिकाणी ‘बिबट्याच्या बाबतीत घ्यावयाची काळजी’ संदर्भातील पोस्टर लावण्यात आली आहेत. शेतामध्ये जाताना चार ते पाच जणांनी समूहाने जाणे, हातात काठी घेऊन जाणे, एकट्याने शेतात जावू नये तसेच सायंकाळी कामाव्यतिरिक्त जास्त वेळ थांबू नये, घरी येताना समूहाने येणे अशा सूचना करण्यात आल्या आहेत. सध्याच्या दिवसात शेतात कामांची लगबग सुरू असल्याने ग्रामस्थांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित ठिकाणी वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. या वेळी दीपक कणसे, प्रकाश पवार, किशोर मोहिते, अमर बागल, प्रशांत चव्हाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते.