स्थैर्य, सातारा, दि. २६ : गेले तीन ते चार महिन्यांपासून माजगाव शिवारात बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. शुक्रवारी मध्यरात्री बिबट्याने थेट गावात प्रवेश करत घरासमोर अंगणात बांधलेल्या शेळीवर हल्ला केला आणि शेळीला फस्त केल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, माजगाव, ता. पाटण येथील कृष्णत मारुती पाटील यांनी आपली शेळी नेहमीप्रमाणे घरासमोरील अंगणात बांधली होती. शुक्रवारी रात्री शेळीला चारा पाणी घालून पाटील झोपी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास गावात घुसलेल्या बिबट्याने पाटील यांच्या अंगणात बांधलेल्या शेळीवर हल्ला करत ठार मारून तिला जागेवरच फस्त केले. शनिवारी सकाळी उठल्यानंतर ही घटना निदर्शनास आली. आसपास बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून येत आहेत. या घटनेचा पंचनामा वनविभागाने केला असून संबंधित शेतकर्यास नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
बिबट्याचा गावात शिरकाव झाल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. बिबट्या आपल्या भक्ष्याच्या शोधार्थ गावात पोहचला असल्याने तो वारंवार गावात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. बिबट्याच्या गावातील वावरामुळे ग्रामस्थांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. यासाठी वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी सापळा लावावा.
– रवीदादा पाटील, ग्रामस्थ, माजगाव.