शाहूनगरला अपार्टमेंटमध्ये बिबट्याची पिल्ले

नागरिकांत भीती; मादीच्या बंदोबस्तासाठी वन अधिकार्‍यांना घेराव


स्थैर्य, सातारा, दि. 28 नोव्हेंबर : अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या शाहूनगर परिसरातील गुरुकुल शाळेच्या मागील एका अपार्टमेंटच्या आवारात गत काल संध्याकाळी बिबट्याची दोन पिल्ले आढळली. वन विभागाने तातडीने पिल्लांना ताब्यात घेतले असले, तरी बिबट्याची मादी याच परिसरात दबा धरून बसल्याची भीती नागरिकांमध्ये पसरली आहे. प्रशासनाने त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शाहूनगरमध्ये काल सायंकाळी एका अपार्टमेंटच्या आवारात ही बिबट्याची पिल्ले नजरेस पडली. पिल्ले अगदी लहान असल्याने त्यांच्याजवळ मादी असण्याची शक्यता बळावली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण
निर्माण झाले. नागरिकांनी तातडीने वन विभागाला माहिती दिल्यानंतर पथकानेधाव घेऊन दोन्ही पिल्लांना सुरक्षितपणे ताब्यात घेतले. ही पिल्ले नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाने परिसरातील नागरिकांना रात्रीच्या वेळी एकटे घराबाहेर पडणे टाळावे, लहान मुलांना कोणत्याही परिस्थितीत एकटे सोडू नये, बिबट्या दिसल्यास धैर्य न गमावता तत्काळ वन विभागाशी संपर्क साधावा,

तसेच सतर्कतेचे आवाहन केले आहे.वन विभागाने परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी गस्त आणि निरीक्षण वाढवले असून, लवकरच नागरिकांच्या मागणीनुसार मादीला जेरबंद करण्याची कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
बिबट्याची पिल्ले थेट मानवी वस्तीजवळ सापडल्याने शाहूनगरमधील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मादी आपल्या पिल्लांच्या शोधात कोणत्याही क्षणी वस्तीत परत येऊ शकते, ही भीती नागरिकांना सतावत आहे. संतप्त नागरिकांनी वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाला तत्काळ मादीला जेरबंद करून दूरच्या वनक्षेत्रात सोडावे, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा आणि प्रशासकीय कार्यालयांना घेराव घालण्याचा इशारा दिला आहे.


Back to top button
Don`t copy text!