
स्थैर्य, सातारा, दि. 3 डिसेंबर : शाहूनगर परिसरात आढळलेल्या दोन बिबट्याच्या बछड्यांपैकी एकाला अखेर पुण्यातील बावधन येथील वाईल्ड अॅनिमल रेस्क्यू सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. सलग चार दिवस वन विभागाने या बछड्याला त्याच्या आईशी पुन्हा एकत्र करण्याचे प्रयत्न केले; मात्र ते निष्फळ ठरल्याने हा निर्णय घेण्यात आला.
सातार्यातील शाहूनगर परिसरातील गुरुकुल स्कूलच्या पाठीमागे, एकनाथ रेसिडेन्सीमध्ये काही दिवसांपूर्वी दोन बिबट्याची पिल्ले रहिवाशांना दिसली. तत्काळ याची माहिती वन विभागाला देण्यात आली. बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात ही पिल्ले सापडल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वन विभागाने तत्काळ दोन्ही पिल्ले सुरक्षित करून त्यांना त्यांच्या आईसोबत पुन्हा भेट घडवण्याच्या उद्देशाने शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रयत्न सुरू केले. रेस्क्यू टीमने त्या ठिकाणी कॅमेरे बसवले आणि रात्रीच्या वेळी दोन्ही पिल्ले त्याच जागी ठेवली जात होती. टीमचे कर्मचारी रात्रंदिवस पहारा देत होते.
कॅमेर्यांतून मिळालेल्या दृश्यमानानुसार, मादी बिबट्या या ठिकाणी आली आणि त्या दोन्ही पिल्लांकडे पाहिले. त्यापैकी एक पिल्लू तोंडात धरून बिबट्याने जंगलाकडे नेले. मात्र दुसरे पिल्लू बिबट्याने पुन्हा स्वीकारले नाही. यासाठी सलग चार दिवस वनविभाग प्रयत्न करत होता. मात्र विवट्या पुन्हा त्या ठिकाणी न आल्याने परिस्थिती गुंतागुंतीची बनली. चार दिवस चाललेल्या प्रयत्नानंतर अधिकार्यांनी बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला. बिबट्याच्या पिल्लाचा जीव धोक्यात राहू नये म्हणून त्याला रेस्क्यू सेंटरमध्ये हलवणे योग्य असल्याचे स्पष्ट झाले. निरोगी पिल्ल सुरक्षीतपणे पुण्याकडे नेण्यासाठी पिल्लाची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्याची प्रकृती उत्तम असून तो फीडिंगलाही चांगला प्रतिसाद देत असल्याचे पशुवैद्यकीय टीमने सांगितले. सर्व प्रकारच्या सुरक्षात्मक उपाययोजना करून रविवारी सकाळी वन विभागाच्या वाहनातून हा बिबट्याचा बछडा पुण्यातील बावधन येथील वाईल्ड अॅनिमल रेस्क्यू सेंटरमध्ये हलवला.
बछडा मोठा झाल्यावर जंगलात सोडणार…पुण्यातील सेंटरमध्ये बछड्याची पुढील काळजी, पोषण आणि आवश्यक वैद्यकीय उपचार मिळतील. बछडा मोठा झाल्यानंतर त्याचे जंगलात पुनर्वसन करण्याबाबत पुढील निर्णय तज्ज्ञांच्या अहवालानुसार घेतला जाणार आहे. मानवी वस्तीत अचानक आलेल्या वन्यजीवांना जखमी न करता, वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन केल्याबद्दल नागरिकांनी विभागाचे आभार मानले.

