स्थैर्य, फलटण : बिबट्या टाकळवाडे, निंबळक, मठाचीवाडी वगैरे परिसरातील अनेक गावांत असल्याची चर्चा सुरु असताना सी.सी.टी.व्ही. कॅमेर्याच्या माध्यमातून बिबट्या पाटबंधारे खात्याच्या निंबळक येथील विश्रामगृह (निंबळक बंगला) परिसरात असल्याचे स्पष्ट झाले असून आज (शनिवार) तेथे पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे वन क्षेत्रपाल निकम यांनी सांगितले आहे.
दरम्यान बिबट्याने निंबळक बंगला परिसरात असलेल्या प्रगतशील शेतकरी काशीराम मोरे यांच्या वस्तीवर असलेला पाळीव कुञा उचलुन नेला असल्याने त्या परिसरासह सर्वत्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. निंबळक भागात गेली दोन महिने बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता तर बिबट्या निर्रढावलेला असुन घरासमोर येत असून पाळीव कुत्रा फस्त केला आहे, त्यामुळे वस्तीसह परिसरात लोक घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत.
मोरे यांच्या घरा समोरुन भला मोठा पाळीव कुञा बिबट्याने नेला असल्याने बिबट्याचा वावर या भागात असल्याचे स्पष्ट झाले आहे, आता वन विभागाने वेळ न दवडता बिबट्यास जेरबंद करुन निंबळक, टाकळवाडे, मठाचीवाडी, पिंप्रद वगैरे परिसराला दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.
गेले सुमारे 2 महिने या भागात बिबट्याचा वावर असल्याचे त्याने फस्त केलेल्या गाई, कुत्री यावरुन तसेच ग्रामस्थांनी त्याला पाहिले असल्याने स्पष्ट झाले आहे, मात्र वन विभाग ठोस पावले उचलत नसल्याची तक्रार करीत भीतीच्या सावटाखाली किती जगायचे असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित करण्यात येत आहे.