दैनिक स्थैर्य । दि. १९ मार्च २०२२ । सातारा । मस्करवाडी (ता. कऱ्हाड) येथे शेतात आज सकाळी नऊच्या सुमारास वैरण आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. शेतातील कडब्याच्या गंजीच्या आडोशाला लपून बसलेल्या बिबट्याने शेतकरी वैरण काढताना अंगावर झडप टाकून जखमी केले.
रामचंद्र रघुनाथ सूर्यवंशी (वय ५५ रा. मस्करवाडी) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. हल्ल्यात शेतकरी जखमी असून त्यांना उपचारासाठी सातारा येथे दाखल केले आहे. घटनेने ग्रामस्थ, शेतकऱ्यात भितीचे वातावरण आहे. ता. कराड असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत वन विभाग व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी रामचंद्र सूर्यवंशी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास गावापासून एक किमी. अंतरावर असलेल्या माऊली कडी नावाच्या शिवारात वैरणीस गेले होते. शेतातील वैरण काढताना कडब्याच्या गंजीच्या आडोशाला बसलेल्या बिबट्याने अचानक रामचंद्र सूर्यवंशी यांच्या अंगावर झडप टाकून हल्ला केला. बिबट्याने सूर्यवंशी यांच्या हातावर, तोंडावर व पोटावर पंजा मारून जखमी केले आहे.
यावेळी सूर्यवंशी यांनी बिबट्याशी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र तरिही तो हल्ला करत होता. त्यानंतर प्रतिकार वाढल्याने बिबट्याने घटनास्थळावरून धूम ठोकली. यानंतर जखमी शेतकरी यांना उपचारासाठी सातारा येथे पाठविले. तर घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे चोरे येथील वनरक्षक ए.एम.जाधव यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.