शेतकर्‍यावर बिबट्याचा हल्ला : करडू ठार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, खंडाळा, दि. 24 : गेले आठवडाभर शिरवळ परिसरात बिबट्याचा मोकाट वावर असतानाचे अनेकांना आढळून आले होते. परंतु वनखात्याला मात्र त्याचा सुगावा लागत नव्हता किंवा बिबट्याचा वावर आहे हे वनखात्याला ठोसपणे सांगता येत नव्हते. मात्र शुक्रवारी रात्री शेळीवर आणि शनिवारी सकाळी शेतकर्‍यावर बिबट्याचा हल्ला झाल्याने वनखाते खडबडून जागे झाले आहे.

घटनास्थळावरून मिळालेली सविस्तर माहिती अशी, की गेल्या आठवड्यात शिरवळ नागरीवस्तीत तसेच इतर ठिकाणी अनेकांना बिबट्या आढळून आला होता. वनखाते ही बिबट्याच्या शोधात होते. परंतु आजतागायत बिबट्याला पकडण्यात वनखात्याला यश आलेले नाही. असे असताना शुक्रवारी रात्री अकरा वाजता अचानक येथील पानसरे वस्ती या ठिकाणी मेंढपाळाच्या बकर्‍यांच्या कळपावर बिबट्याने झडप घालून एक करडू मारून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. परंतु मेंढपाळाने आपली कुर्‍हाड बिबट्याच्या दिशेने भिरकावल्यामुळे बिबट्याने शेजारील ऊसामध्ये धूम ठोकली. सदर घटनेची माहिती तात्काळ वनखात्याला कळविण्यात आल्या नंतर रात्रभर वनखात्याने बिबट्याचा शोध घेतला. परंतु बिबट्या आढळून आला नाही. शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास पानसरेवस्ती येथील शेतकरी शेतात उसाला पाणी देण्यासाठी गेला असता शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेतकर्‍याच्या अंगावर झेप घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात तेथील कुत्र्यांनी बिबट्याचा पाठलाग केल्याने सुदैवाने शेतकरी बचावला. थरकाप उडालेल्या शेतकर्‍याने जिवाच्या आकांताने ओरडून आसपासच्या शेतकर्‍यांना सतर्क केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सदरची माहिती मिळताच खंडाळा वनविभागाच्या अधिकारी जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. त्याचप्रमाणे घटनास्थळी वनखात्याने व शेतकर्‍यांनी काठ्या वाजवून बिबट्याचा शोध घेतला. परंतु बिबट्या आढळून आला नाही. बिबट्या तीन चार दिवसाचा भुकेलेला असावा. त्यासाठी त्याने हल्ले करण्यास सुरुवात केली असावी. यामुळे शिरवळ तसेच परिसरातील शेतकर्‍यांनी पुढील दोन-तीन दिवस एकटे शेतात जाऊ नये, असे आवाहन वनाधिकारी जगताप यांनी केले आहे. या अगोदर फक्त काही ठिकाणी आढळून येत असणार्‍या बिबट्याने आता चक्क दिवसा हल्ले करण्यास सुरुवात केल्याने परिसरातील नागरिक तसेच शेतकरी पुरता धास्तावला आहे. बिबट्याचा शोध लवकरात लवकर घेण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले तसेच खंडाळा पंचायत समितीचे सभापती तथा लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र तांबे यांनी केली आहे.

 …तरच बिबट्या नागरी वस्तीत शिरणार नाहीदरवर्षी मार्च ते एप्रिल या दरम्यान डोंगरावर वनवा लावला जातो. संपूर्ण डोंगरच्या डोंगर जळून खाक होतात. त्यामुळे वन्यप्राणी नागरीवस्तीत प्रवेश करतात. वनखात्याने प्रथम वनवा रोखण्याच्या उपाययोजना करायला हव्यात तरच वन्यप्राणी नागरी वस्तीत शिरणार नाहीत, अशी घटनास्थळी चर्चा होती. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!