कोरेगाव शहरालगत वाढला बिबट्याचा वावर


स्थैर्य, सातारा, दि. 13 डिसेंबर : कोरेगाव शहर आणिपरिसरात बिबट्या आणि त्याच्या बछड्यांचा वाढता वावर समोर येत असून, स्थानिक नागरिक व शेतकर्‍यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर वन विभागाने तातडीने पुढाकार घेऊन बिबट्याला जेरबंद करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी व नागरिकांच्या शिष्टमंडळाने आज वन विभागाच्या कोरेगाव कार्यालयातील वनक्षेत्रपाल चंद्रहार जगदाळे यांची भेट घेऊन केली.

याबाबत राहुल बर्गे म्हणाले, बिबट्याचा वावर निश्चित झाला असून, त्याचे ठसेही वन विभागाने तपासून पुष्टी केली आहे. संबंधित बिबट्या अंदाजे दोन ते अडीच वर्षांचा असल्याचे प्राथमिक अनुमान असून, त्याला पकडण्यासाठी तातडीने पिंजरा लावणे, गस्त वाढवणे आणि संवेदनशील भागात सतर्कता वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. राजेश बर्गे, पृथ्वीराजबर्गे व विजय घोरपडे यांनी या भागातील शेतकरी आणि नागरिकांना येणार्‍या अडचणींचे सविस्तर वर्णन केले.

वनक्षेत्रपाल चंद्रहार जगदाळे म्हणाले, ऊसतोडणी निवासी परिसरात प्राधान्याने झाली, तर बिबट्या मानवसदृश्य वस्तीच्या दिशेने येण्याची शक्यता कमी होते. यासाठी वन विभागाने संबंधित साखर कारखान्यांना लेखी पत्र देत आवश्यक सूचना केल्या आहेत. या मागणीची दखल घेत कंपनीचे अधिकारी श्री. निकम यांनी अधीक्षक अभियंता बाळासाहेब हाळनोर, सातारा विभागाचे कार्यकारी अभियंता डॉ. अमित बारटक्के यांच्याशी तातडीने चर्चा करून प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन दिले. बिबट्याचा वावर असलेल्या भागातील नागरिकांसाठी बचावात्मक उपाययोजनांची माहिती देणारे पत्रक व भित्तिपत्रक तयार करण्यात आले असून, त्याचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. या शिष्ठमंडळात सुनील बर्गे, साईप्रसाद बर्गे, राजेंद्र वैराट, सचिन बर्गे, दीपक फाळके, संतोष बर्गे, गिरीश शेटे, रोहन जाधव आदी सहभागी होते.


Back to top button
Don`t copy text!